सिडको भवनचे प्रवेशद्वारावरील छत कोसळले

सुदैवाने जिवीत हानी टळली
पनवेल/प्रतिनिधी
राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ असलेल्या बेलापूर येथील  सिडको भवन असुरक्षीत असल्याचा प्रत्यय गुरुवारी आला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वारावरील पीओपीचे छत खाली कोसळले. सुदैवाने कोणीत जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे कर्मचारी आणि कार्यालयात येणार्‍या नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
सिडकोचे बेलापूर येथे मुख्य कार्यालय आहे. एकूण 7 मजली असलेल्या या प्रशस्त इमारतीत कार्मीक, अभियांत्रीकी, सिडको रेल्वे प्रकल्प, आरोग्य, वसाहत, पणन, परिवहन, साडेबारा टक्के यासारखी सिडको अंतर्गत अनेक कार्यालये आहेत. येथे हजारो कर्मचारी काम करतात. त्याचबरोबर विविध कामानिमित्त नागरिकसुद्धा सायंकाळच्या सुमारास सिडको भवनमध्ये येतात. एकंदरीतच शासकीय कार्यालयाचे हब असलेल्या बेलापूरमध्ये सिडको भवन ही अतिशय महत्वाची शासकीय इमारत समजली जाते.
परंतू येथील देखभाल, डागडुजी तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खबरदारी घेतली जात नसल्याचे गुरुवारी उघडकीस आले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या प्रवेशद्वारावरील पीओपीचा काही भाग खाली पडला. हे तुकडे वजनदार होते. त्यामुळे कदाचीत खाली उभ्या असलेल्या एखाद्याच्या डोक्यावर पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शी महादेव वाघमारे यांनी सांगितले.
“सिडको भवनमध्ये दररोज हजारो कर्मचारी आणि नागरिकांचा वावर असतो. या प्राधिकरणाने नवी मुंबई वसवली आहे. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाची नोडल एजन्सी म्हणून सिडको काम करीत आहे. असे असताना आपल्या सिडको भवनकडेच लक्ष द्यायला प्रशासनाकडे वेळ नाही ही शोकांतिका आहे.”
– महादेव वाघमारे,
सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published.