अहमदनगर मध्ये मराठा मुलांसाठी पहिले वसतिगृह

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर /प्रतिनिधी:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह योजने अंतर्गत जिल्हानिहाय वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने केडगाव येथे मराठा मुलांसाठी जिल्ह्यातील पहिले वसतिगृह सुरु करण्यात आले.  पालकमंत्री प्रा . राम शिंदे हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले.
या वसतीगृहात 50 विद्यार्थ्यांची राहण्याची क्षमता आहे. तसेच भोजनाचाही व्यवस्था करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या मागणीनंतर राज्यसरकारने मुलांसाठी वसतिगृह सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्याचा निर्णय घेतला.  सर्व तालुक्यातील मराठा समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षणाकरता जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच अहमदनगर शहरात येतात. त्यांची राहण्याची सोय होत नाही. किंवा जास्त पैसे मोजावे लागतात. या सर्व दृष्टिकोनातून शासकीय योजनेतून नगरमध्ये अशा विद्यार्थ्यांकरता वस्तीगृह व्हावं यासाठी पालकमंत्री प्रा राम शिंदे आणि पुढाकार घेतला. त्यानुसार केडगाव येथे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील गुणवत्ताधारक मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी होणार आहे. येथे उच्च दर्जाची सुविधा व अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांच्यात गुणवत्ता असूनही राहण्याची सोय नसल्याने त्यांना अर्धवट शिक्षण सोडून देण्याची वेळ येऊ नये अशा मुलांसाठी राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून राज्यसरकारने मराठा समाजातील मुलांसाठी वसतिगृह सुरु करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यात अहमदनगर जिल्हयात हे पहिले वसतीगृह असून त्याचा लाभ सर्वसामान्य विद्यार्थ्याना होईल, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले. त्यांनी या वसतिगृहात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर,  राजाभाऊ मुळे, सहधर्मादाय आयुक्त हिरा शेळके, अनिल मोहिते  गणेश ननवरे,
डॉ मुकुंद सातारकर, कार्यकारी अभियंता राऊत, बापू निंबाळकर, रवींद्र मुळे,  डॉ . दादासाहेब करंजुले, अमर कळमकर, योगेश जोशी,  श्रीराम राजेश्वर, अशोक गायकवाड उपस्थित होते.