स्टील चेंबरच्या बाप्पाचे सर्वप्रथम विसर्जन

मंडळाकडून कळंबोलीत गुलाल विरहित मिरवणूक
पनवेल /प्रतिनिधी: – कळंबोली स्टील चेंबर च्या बाप्पाचे सालाबाद प्रमाणे यंदाही सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले. यानिमित्ताने वसाहतीत गुलाल विरहीत मिरवणूक काढून मंडळाने इतरांसमोर वस्तू पाठवला ठेवला.
स्टील चेंबर ऑफिस प्रिमायसेस मध्ये दीपक निकम यांच्या पुढाकाराने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याचबरोबर कृष्णलीलेचा  देखावाही साकारण्यात आला होता. गेले दहा दिवस गणरायांची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरुवारी बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. सकाळी अकरा वाजता स्टील चेंबर येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पुणेरी ढोल तसेच पारंपारिक लेझीम हे मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य होते. वेगवेगळी फ्यूजन वाजवत राजगुरुनगर येथून आलेला ढोल पथकाने कळंबोलीकरांना जिंकून घेतले. गणरायांच्या समोर आणि ढोल-ताशांच्या तालावर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिपक निकम, स्टील चेंबर ऑफिस प्रिमायसेस सोसायटीचे अध्यक्ष बबन दांगट, दत्तात्रेय आंधळे,सुरेश पानमंद, मुरली गुरव, दत्ता बिनवडे,कृष्णा भगत, व्यवस्थापक सुधाकर काळबैले यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.दांगड व पानमंद यांनी तर लेझीमचा डाव धरीत आपल्या गावाकडील आठवणींना उजाळा दिला. दरवर्षाप्रमाणे यावेळी ही गुलाल टाळून गणराया व मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्याचबरोबर इतरांप्रमाणे जादा फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली नाही. यावेळी विजय कुरकुटे, प्रभाकर उंडे, संजय गर्ग, प्रियांक माळी, संपत तोतला, सुरेश पिंगळे यांच्यासह कर्मचारी सोसायटीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दरवर्षी आम्ही सर्वात अगोदर आमच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढतो. जेणेकरून दुपारपर्यंत मार्गावर तसेच विसर्जन घाटावर गर्दी नसते. वाहतुक कोंडीही होत नाही.
सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी प्रत्येक वर्षी आम्ही  घेतो.”
दिपक निकम अध्यक्ष गणेशोत्सव मंडळ