तळोजा डम्पिंग ग्राउंड पावसामुळे बंद

महापालिका हद्दीत कचराकोंडी
टेंभोडे , ओवे येथे कचऱ्याचे ढीग
पनवेल प्रतिनिधी: – तळोजा लगतच्या घोट चाळ येथील डम्पिंग ग्राउंड गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे बंद आहे. पाणी साचल्याने आत मध्ये वाहने जात नाहीत. या कारणामुळे मनपा हद्दीतील कचरा टेंभोडे आणि ओवे येथील मोकळ्या भूखंडावर टाकला जात आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात ढीग साचले आहेत.
गेल्या वर्षापासून घनकचरा व्यवस्थापन पण महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. मनपाने कचरा उचलना करिता साई गणेश एजन्सी नियुक्त केली आहे. त्याचबरोबर स्वतःच्या मालकीचे वाहने खरेदी केले आहेत. त्या माध्यमातून सिडको वसाहतीतील कचरा उचलून तो घोट येथील डम्पिंग ग्राउंड वर टाकला जातो. दरम्यान क्षेपण भूमी ही सिडकोच्या मालकीचे आहे. याठिकाणी कचऱ्यावर होणारा प्रक्रिया खर्च मनपा आदा करते. परंतु बाकी सर्व कामे सिडकोकडून केले जातात. घोट चाळ येथील हे डम्पिंग ग्राउंड सातत्याने वादग्रस्त राहिले आहे. याठिकाणी कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया केली जात नसल्याचे आजुबाजूच्या गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येथेच, त्याचबरोबर डम्पिंग मधील सांडपाणी आजूबाजूच्या शेतात गेल्याने मोठे नुकसान होत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात येथे कचरा टाकून दिला जात नाही. गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे तळोजा क्षेपण भूमीवर पाणी साचले आहे. आत मध्ये कचरा भरून आलेली वाहने जात नसल्याचे महापालिका हद्दीत कचरा कोंडी झालेली आहे. दरम्यान सर्व ठिकाणचा कचरा नियमितपणे उचलला जात असला तरी तो डम्पिंग वर जात नाही. त्यामुळे खारघर चा ओवे येथे तर कळंबोली, कामोठे , नवीन पनवेल आणि पनवेल शहरातील कचरा टेंभोडे वळवली येथील मोकळ्या जागेवर टाकला जात आहे. परिणामी या दोन्ही ठिकाणाला डम्पिंग ग्राऊंड चे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत आहे. दरम्यान येथे दुर्गंधी पसरली आहेच तसेच स्वच्छतेचा ही बोजवारा उडाला आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
महापालिकेला हवी स्वतंत्र क्षेपणभूमी
पनवेल महानगरपालिका हद्दीत दररोज पाचशेपेक्षा जास्त टन कचरा निर्माण होतो. दरम्यान घोट येथील डम्पिंग ग्राउंडची क्षमता जवळपास संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेला स्वतंत्र क्षेपण भूमीची आवश्यकता आहे. यासाठी सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली आहे.