कर्जत – जामखेड मध्ये भाजपची अडचण दूर

नामदेव राऊत प्रा .राम शिंदे यांचेच काम करणार
खासदार सुजय विखे यांची शिष्टाई कामी
कर्जत/ प्रतिनिधी:- कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी स्वतंत्र मेळावा घेऊन महासंग्राम संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. मात्र खासदार डॉ सुजय विखे यांनी शुक्रवारी यशस्वी शिष्टाई केल्याने राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदनगर चे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांचेच काम करण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपा समोरील अडचण दूर होऊन राष्ट्रवादीच्या अपेक्षित समीकरणाचे फासे सैल झाले आहेत.
कर्जत शहर आणि परिसरात नामदेव राऊत यांची ताकत आहे. त्यांनी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष पद भूषवले आहे. दरम्यान कर्जत जामखेड मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने नऊ सप्टेंबर रोजी आपल्या महासंग्राम संघटनेच्या माध्यमातून समर्थकांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी आपल्यालाही विधानसभे करिता संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान राऊत यांची बंडखोरी आपल्या पथ्यावर पडेल असा कयास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लावला जात होता. दरम्यान कार्यक्षम मंत्री म्हणून गेल्या पाच वर्षात प्रभावी काम करणाऱ्या प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात शरद पवार यांचे नातू पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी येथे जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्जत जामखेड मतदार संग मतदारसंघात मावळची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. त्याचबरोबर विखे पिता-पुत्रांनी रोहित पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार त्यांनी नामदेव राऊत यांच्याशी चर्चा करून त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवले. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एक ओबीसी चेहरा म्हणून राऊत यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची शब्द दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी खासदार विखे यांच्यामार्फत दिला. तो संदेश घेऊन डॉ सुजय विखे यांनी शुक्रवारी राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले. आपण आगामी विधानसभा निवडणुकीत प्रा .राम शिंदे यांचे पूर्ण ताकदीनिशी काम करणार असल्याची ग्वाही नामदेव राऊत यांनी यावेळी दिली.

वाघ -गुंडांना भेटल्या
दरम्यान कुलधरण जिल्हा परिषद गटाच्या सदस्य तसेच राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुश्री गुंड यांनी रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आपल्याला मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. परंतु येथे पवारांचे नाव निश्चित झाल्याने गुंड आणि त्यांचे पती नाराज आहेत. च्या भाजपाच्या वाटेवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राशीन येथे महिला मेळाव्या करता आलेल्या राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि भाजपच्या विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी मंजुश्री गुंड यांची भेट घेतली.