जातीचा नव्हे मातीचा फॅक्टर प्रभावी

कर्जत – जामखेड मतदारसंघातील ग्राऊंड रिपोर्ट
नाना करंजुले
जामखेड/ प्रतिनिधी: – कर्जत जामखेड मतदार संघात पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य तथा शरद पवार यांचे नातू रोहित पवार राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आहेत. दरम्यान पवारांच्या भविष्याला अहमदनगर चे पालकमंत्री प्रा .राम शिंदे यांचे मोठे आव्हान आहे. तसेच भाजपाचा गड काबीज करण्यासाठी विरोधकांकडून छुप्या पद्धतीने कास्ट फॅक्टरचा प्रचार सुरू करण्यात आला असला तरी. प्रा शिंदे स्थानिक उमेदवार असल्याने जातीचा नव्हे तर मातीचा करिष्मा या मतदारसंघात अधिक प्रभावी ठरेल असे चित्र दिसून येत आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ दहा वर्षापूर्वी आरक्षित होता. या मतदार संघाचे सदाशिव लोखंडे नेतृत्व केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सुवर्णकाळात ही कर्जत-जामखेड करांनी भाजपाला कौल दिला. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षापासून येथे प्रा. राम शिंदे आमदार म्हणून निवडून येत आहेत. येथील सर्व समाजांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारत लोकमान्यता दिली. त्यांच्या रूपाने दुर्लक्षित असलेल्या या दोन्ही तालुक्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये   स्थान मिळाले. त्यापेक्षाही भारतीय जनता पक्षाने एका सालगड्याच्या मुलाला महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर पोहोचवले. हे आमच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ऑनलाइन बातमीकडे या मतदारसंघातील सामान्यांनी नोंदवल्या.2009 ला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी प्रा .राम शिंदे यांना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण महाराष्ट्राच्या विधिमंडळात या मतदारसंघाचे नेतृत्व करू लागला. त्यांनी आपल्या कामाची तसेच वक्तृत्व कौशल्याची छाप पाडली. त्याच काळात भाजपाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीस प्रभावी काम केले. त्याच्या कामाच्या जोरावर प्रा राम शिंदे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले. अगोदर राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती होती. दरम्यान 2014 ला या मतदारसंघातून वंजारी समाजाचे खाडे आणि धनगर समाजातील मतांचे विभाजन व्हावे याकरता इंद्रजीत भिसे हे निवडणूक रिंगणात उतरले होते. दरम्यान दोन्ही समाज प्रा.राम शिंदे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. त्याचबरोबर मराठा समाजानेही भाजपलाच पसंती दिली. एकंदरीतच त्या निवडणुकीत कोणताही कास्ट फॅक्टर चालला नाही हे स्पष्ट झाले. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून जातीचा आधार घेत एक प्रकारे छुपा प्रचार सुरू केला आहे. विशेष करून मराठा समाजाला राष्ट्रवादीच्या बाजूने झुकण्याच्या  दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. परंतु गेली पन्नास वर्ष मराठा समाज आरक्षणाकरता लढा देत आहे. परंतु आघाडी शासनाच्या काळात या प्रश्नाची घोंगडी सातत्याने भिजत ठेवण्यात आली. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हालचाली झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा दृष्टिकोनातून पुढाकार घेतला. न्यायालयात शासनाने आपली बाजू भक्कमपणे मांडली. परिणामी मराठा समाजाला आरक्षण मिळाले. यासाठी मंत्री म्हणून प्रा. राम शिंदे यांची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या पुढाकाराने नगर येथे मराठा समाजाच्या मुलांकरिता वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाला नेमका कोणी विरोध केला. इतकी वर्ष सत्ता असतानाही आरक्षण का मिळाले नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर द्यावे असा सवाल मराठा समाजातील अनेक तरुणांनी ऑनलाइन बातमी शी बोलताना उपस्थित केला. त्यामुळे या मतदारसंघात कास्ट रणनीती वातावरण तापण्या अगोदरच थंड झाले आहे. दरम्यान प्रा .राम शिंदे हे स्थानिक उमेदवार आहेत. जामखेड कर्जत हीच त्यांची जन्म आणि कर्मभूमी आहे. त्यांना या मतदारसंघातील खडानखडा माहिती आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे आपला तो आपलाच असतो काही झाले तरी आपल्या मातीतला उमेदवार निवडून द्यायचा असा संकल्प अनेक गावांमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जातीपेक्षा मातीचा फॅक्टर यशस्वी होईल असे एकंदरीतच चित्र असल्याचे ऑनलाइन बातमीने घेतलेल्या ग्राउंड रिपोर्ट वरून स्पष्ट झाले आहे.