अहमदनगर मध्ये भाजपाच्या सर्व विद्यमान आमदारांना तिकीट

श्रीगोंदा येथून बबनराव पाचपुते निवडणूक रिंगणात
नाना करंजुले
अहमदनगर/ प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने सर्व विद्यमान आमदारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्याचबरोबर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनाही श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट कापण्याच्या चर्चांना पूर्णपणे विराम बसला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात  शिर्डी, कोपरगाव, शेवगाव, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, अकोले हे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्यावर आले आहेत. तर पारनेर, नगर शहर आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आले आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांना निवडणूक रिंगणात उतरल्या करता संगमनेर विधानसभा मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडे असावे अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने विखे यांनी तयारी सुरू केली होती. परंतु जागांच्या वाटाघाटीत शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवून विखे यांना एक प्रकारे दणका दिला आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा शिवसेनेकडे जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतु हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यात भाजपाला यश मिळाले आहे. त्यामुळे या ठिकाणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासमोरील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. नगर शहरातील एबी फॉर्म शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना पक्षप्रमुख आणि दिला असल्याने ही जागा शिवसेना लढविणार हे स्पष्ट झाले होते.शिर्डी येथून आपेक्षा प्रमाणे विखे यांना उमेदवारी मिळाली आहे.
शेवगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना  विरोध होता. परंतु पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. कोपरगाव मधून आमदार स्नेहलता कोल्हे यांचे तिकीट कापले
जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र स्नेहलताताई याच  भाजपाचा उमेदवार असणार आहेत. नेवासा विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब मुरकुटे यांना पुन्हा भाजपने संधी दिली आहे. तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले राहुरी येथून आपले नशीब आजमावणार आहेत. अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जत जामखेड मधून एकटेच इच्छुक होते  त्यांची उमेदवारी अगोदरच निश्चित होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत प्रा .शिंदे पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असतील अशी घोषणा करून आपले इरादे स्पष्ट केले होते. अकोले येथून वैभव पिचड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दोन्ही जगतापांना आता घड्याळ शिवाय पर्याय नाही
दरम्यान आमदार संग्राम जगताप आणि राहुल जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा गेली काही दिवस रंगली. मात्र भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार नगर शहर आणि श्रीगोंदा मतदारसंघासाठी जाहीर केले आहेत. त्यामुळे दोन्ही जगतापांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
नागवडे यांची निवडणूक लढवण्याची इच्छा अपुरीच
 जिल्हा परिषदेचा सभापती अनुराधा नागवडे या डॉ .सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असपल्याचे बोलले जात होते. त्या अनुषंगाने चाचपणी आणि हालचाली सुद्धा झाल्या. परंतु शेवटी संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीतही राहुल जगताप यांनी पक्ष बदलल्यास नागवडे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील असा कयास बांधला जात होता. तसेच पाचपुते यांना पर्याय म्हणून भाजपकडून त्यांचाही विचार होऊ शकतो अशाही अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु भारतीय जनता पक्षाने बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.