बेलापूर मधून गणेश नाईक नव्हे तर मंदाताई म्हात्रे

ऐरोलीतून  संदीप नाईक निवडणूक लढणार
नवी मुंबई/ प्रतिनिधी:- बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. परंतु भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत या मतदारसंघातूनआमदार  मंदाताई म्हात्रे यांच्या नावाचा समावेश आहे. तर ऐरोली विधानसभा मतदार संघातून नाईक यांचे पुत्र संदीप भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माजी मंत्री गणेश नाईक यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्यामुळे नवी मुंबईतील सत्ता व राजकीय समीकरण बदलले. दरम्यान संदीप नाईक यांनी सर्वात अगोदर कमळ हातात घेतले. त्यावेळी नाईक यांच्या  राजकिय  विरोधक आमदार मंदा ताई म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मागील निवडणुकीत म्हात्रे यांनी नाईक यांचा धक्कादायक पराभव केला होता. दरम्यान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला तिकीट मिळणार असा शब्द दिला होता. दरम्यान गणेश नाईक यांच्या प्रवेशानंतर त्यांना बेलापूर मधून निवडणूक रिंगणात उतरवले जाणार असल्याची चर्चा होती. परंतु मंगळवारी जाहीर झालेल्या यादीमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे कमळाच्या चिन्हावर पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले. तर संदीप नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करून नाईक कुटुंबियांचं पहिल पुनर्वसन भाजपने केले आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीचे मोठे आव्हान
दरम्यान बेलापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा याकरीता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीला साकडे घातले होते. परंतु दोन्ही मतदारसंघ भाजपाला देण्यास पक्षप्रमुखांनी अनुकूलता दर्शवली. यामुळे नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना रिकामे हातीच परतावे लागले. दरम्यान या ठिकाणी राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. ही बंडखोरी आणि नाराजी दूर करण्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे.