रायगड जिल्ह्यात आघाडीमध्ये जागावाटपाचा पेच

उरण आणि पेण मध्ये काँग्रेसकडून  उमेदवार जाहीर
शेतकरी कामगार पक्ष समोर अडचणी वाढण्याची शक्यता
नाना करंजुले
पनवेल/ प्रतिनिधी:- रायगड जिल्ह्यात भाजपाला दोन आणि शिवसेनेला 5 असे जागा वाटप झाले आहे. एकीकडे महायुतीचे जमले आहे. तर दुसरीकडे आघाडीमध्ये फारसा समन्वय नसल्याचे दिसून येत आहे . काँग्रेस पक्षाने उरण आणि पेण या दोन मतदार संघात मंगळवारी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे विशेष करून  शेतकरी कामगार पक्षा समोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान वरिष्ठ पातळीवर समझोता होतोय की नाही याकडे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेत सत्तेत आहेत. लोकसभा निवडणुकीतही शेकापने सुनील तटकरे यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. दरम्यान या दोन्ही पक्षांची गट्टी आहेच. त्याचबरोबर राज्यात राष्ट्रवादी व  काँग्रेसची आघाडी असल्याने पर्यायाने काँग्रेसलाही रायगड जिल्ह्यात शेकाप सोबत जावे लागत आहे. वास्तविक पाहता जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता. शेकाप आणि काँग्रेस सातत्याने विरोधात राहिले. विशेष करून अलिबाग आणि पेण येथे दोन्ही पक्षांमध्ये शह-काटशहाच्या राजकारण चालले. शेकाप आणि राष्ट्रवादी सोबत जावे लागत असल्याने माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपाचे कमळ हातात घेतले. त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल येथे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत आणि श्रीवर्धन येथे निवडणूक लढणार आहे. तर रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिकराव  जगताप यांच्यासाठी महाड विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील जागावाटपासंदर्भात तीनही पक्षांमध्ये फारसा समन्वय झाल्याचे दिसून येत नाही. उरणमध्ये माजी आमदार विवेक पाटील निवडणूक लढवत आहेत. आपण आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले. तर धैर्यशील पाटील पेण मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत. दरम्यान काँग्रेस ने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये उरणमध्ये डॉ मनीष अनंत पाटील यांचे तर पेण विधानसभा मतदारसंघात नंदा राजेंद्र म्हात्रे यांचे नाव आहे. दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला म्हणणारा वर्ग आहे. येथे हाताच्या पंजाची निर्णयाक  मत असल्याने ते शेतकरी कामगार पक्षाला अपेक्षित आहेत. परंतु काँग्रेसने उरण आणि पेण येथे उमेदवार दिल्याने आघाडी समोर पेच निर्माण झाला आहे. त्याचबरोबर याचा फटका शेतकरी कामगार पक्षाच्या मतांवर बसणार आहे. या दोन्ही जागा जिंकून येतील अशी शेकापला विश्वास  आहे. कारण माजी आमदार विवेक पाटील आणि आमदार धैर्यशील पाटील हे जिल्ह्यातील  तुल्यबळ उमेदवारांपैकी आहेत. त्यामुळे हा पेच सोडवण्याचे मोठे आव्हान शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वासमोर आहे.
पनवेल मधूनही कांतीलाल कडू निवडणूक लढवणार
काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कांतीलाल कडू हे गेल्या दोन वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांनी पक्षाकडे रीतसर उमेदवारी सुद्धा मागितलेली आहे. दरम्यान पेण आणि उरण प्रमाणे पनवेल लाही काँग्रेसने उमेदवार द्यावा असा एक मतप्रवाह आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर कडू अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.