धनंजय मुंडे यांनी साधला पनवेल स्थित परळीकरांशी संवाद

रोडपाली येथे बैठक संपन्न
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल परिसरात वास्तव्यास असलेल्या परळीकरांशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी  संवाद साधला. रोडपाली येथे फोनेक्स हाइट्स मध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी गावाकडे चला रे ची हाक देण्यात आली.
पनवेल परिसरात पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाड्यातून नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक जण स्थायिक झाले आहेत. त्यापैकी बीडकरांचे प्रमाण जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी खांदा वसाहतीत स्नेहमेळावा घेतला होता. दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक कुटुंब सिडको वसाहतीमध्ये स्थायीक आहेत. त्यामध्ये वाहतूकदारांची संख्या जास्त आहे. या सर्वांबरोबर संवाद साधण्याकरता धनंजय मुंडे रविवारी सायंकाळी थेट रोडपाली येथे दाखल झालॆ. नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भागातील मंडळींशी हितगुज साधले. दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघ ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे आणि धनंजय मुंडे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. बहिण भावाच्या या लढतीकडे महाराष्ट्रचे लक्ष लागले आहे. त्या अनुषंगाने अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरू आहे. याकरीता एक मत महत्त्वाचे मानले जाते. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पनवेल स्थित परळीकरांशी रविवारी भेट घेतली. एका लेकीला खासदार तर दुसऱ्या लेकीला आमदार म्हणून निवडून दिले. या लेकाला एकदा तरी  विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहन मुंडे यांनी उपस्थितांना केले. त्यांनी केलेल्या विकास कामांचा त्याचबरोबर  विविध प्रश्नांवर कशापद्धतीने आवाज उठवला याची माहिती दिली.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडून धनंजय मुंडे यांचे स्वागत
दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे रोडपाली ते आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी स्वागत केले. यावेळी विजय आपलाच आहे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनीही मुंडेंना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत त्यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.