चिंचवलीत शंभर टक्के प्लास्टिक मुक्तीची ‘शाळा’

 

 

राजिप शाळेतील शिक्षक व विदयार्थ्यांचा पुढाकार

अनोखा उपक्रम राबवून ठेवला वस्तुपाठ

पनवेल/प्रतिनिधी- नो सिंगल युज प्लास्टिक असा नारा केंद्र शासनाने दिला आहे. त्या आगोदर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चिंचवली गाव शंभर टक्के प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विदयार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या संकल्पपुर्तीकरीता ग्रामस्थांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.

प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे.तसेच मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने प्लास्टिकवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.परंतु मानसकितेत बदल होत नसल्याने अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. दंडात्मक कारवाई तसेच कायदयाचा धाक दाखवून प्लास्टिक निर्मुलन करता येणार नाही. याकरीता प्रभावी जनजागृती आणि प्रबोधनाची गरज आहे. ही गोष्ट ओळखून रायगड जिल्हा परिषदेच्या चिंचवली शाळेने याकरीता पुढाकार घेतला. राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने स्वच्छता हीच सेवा, प्लास्टिक मुक्त भारत 2019 या अभियानार्तंगत उपक्रम राबवला.  शाळेने पर्यावरण तसेच मानवी जीवन, प्राणी यांच्या आरोग्याला घातक प्लास्टिक पिशव्यांना केवळ घरातूनच नव्हे तर मनातून हद्दपार करण्याचा बांधला. याकरीता  निबंध वकृत्व  स्पर्धाचे  आयोजन करण्यात आले.
तसेच गावात प्लास्टिक बंदीबाबत रॅली काढण्यात आली. यामध्ये अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनीही उस्फुर्त सहभाग नोंदवला. प्लास्टिक हटाव जिवन बचाव, कापडी पिशवी वापरा, पर्यावरण वाचवा, स्वप्न आपल्या सर्वांचे प्लास्टिक मुक्त चिंचवलीचे अशा घोषणा देत संपूर्ण गाव दणदणून सोडले. यानिमित्ताने  गावातील प्लास्टिक जमा करण्यात आले. शालेचे मुख्याध्यापक सुनिल ठाकरे यांनी प्लास्टिकांपासून होणारे पर्यावरणाचे नुकसान याविषयी ग्रामस्थांना  मार्गदर्शन केले. पनवेल तालुक्यातील पहिले शंभर टक्के  प्लास्टिक मुक्त गाव  करण्याकरीता सर्वांनीच शपथ घेतली. तो मान आपणच मिळवू असा विश्वास  असलम चोचे यांनी  व्यक्त केला.
शाळेकडून प्रत्येक कुटुंबाला एक कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.  तसेच जमा झालेले प्लास्टिक ग्रुप ग्रामपंचायत शिरवली येथे ग्रामसेवक तानाजी मेकाले यांच्याकडे जमा करण्यात आले. त्यांनाही एक कापडी पिशवी भेट देण्यात आली. या अभियानात अंगणवाडी सेविका योगिनी नामदेव महाले ,ताई नारायण काठावले, योगिता काठावले यांनी मोलाचे सहकार्य मिळाले . तसेच गावातील शिक्षणप्रेमी गुरुनाथ ठोंबरे, परशुराम रिकामे, विशाल ठाकूर, रामचंद्र खाने, लहु मुंढे, कैलास ठोबरे, गुरुनाथ मुंढे, संतोष ढिसले, सुरेश रिकामे, दिलीप फराड, महेंद्र खाने, प्रदिप खाने, दिनेश पाटील, दिपक ठोंबरे यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.  व शाळेने राबविलेल्या या आनोख्या तसेच आदर्शवत  उपक्रमाचे अभिनंदन केले. केंद्रप्रमुख सुप्रिया पाटील यांनीही चिंचवलीकरांचे अभिनंदन केले.