पनवेल-उरणमधील युती धर्माचे मनोमिलन

 

 

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा 

खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार

पनवेल/प्रतिनिधी-महेश बालदी यांच्या बंडखोरीमुळे पनवेल उरणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला होता.परंतु बुधवारी सकाळी पनवेल येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये दोनही मतदारसंघात युतीचा धर्म पाळण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत पनवेल उरणमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रीत काम करून श्रीरंग बारणे यांना मताधिक्य दिले. विधानसभेकरीताही राज्यात युती झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी नाराजांनी बंडखोरी केली . काही बंड थंड करण्यास दोनही पक्षांना यश आले आहे. परंतु काही जागेवर पक्षाकड़ून तिकिट मिळाले नाही म्हणून  ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये उरण विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. ही  जागा शिवसेनेच्या वाटेवर आली आहे. त्यामुळे आमदार मनोहर भोईर निवडणुक लढवत आहेत. परंतु येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष निवडणुक रिंगणात उतरले आहेत.त्यांचा बंड थंड करण्यास महायुतीला यश मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांचा उमेदवारी अर्ज  पनवेलमध्ये  दाखल केला होता. मात्र पाटील यांनी तो मागे घेतला. परंतु उरणमध्ये मात्र शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान बालदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे काही प्रमाणात शिवसेनेमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, संपर्कप्रमुख दत्ता दळवी, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास  शेवाळे, तालुका संघटक भरत पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दोनही मतदारसंघात युतीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.