पनवेल – उरण मध्ये आघाडी – युतीला शिट्टीचे आव्हान

अपक्ष महेश बालदी व कांतीलाल कडू यांचा प्रचार ठरणार लक्षवेधी
नाना करंजुले
पनवेल प्रतिनिधी:- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांसमोर नाराजांनी उमेदवारी अर्ज भरून डोकेदुखी वाढवली आहे. उरण आणि पनवेल या दोन विधानसभा मतदारसंघात तीच परिस्थिती आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कांतीलाल कडू हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे या दोनही अपक्ष उमेदवारांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. दोघेही राजकारण आणि समाजकारणात मातब्बर असल्याने त्यांचा प्रचार लक्षवेधी ठरणार आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वजन असलेले बालदी पूर्ण ताकतिनिहाय निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असले तरी पक्षाची यंत्रणा त्यांनी कामाला लावले आहे. असे असले तरी बालदी यांना कमळ चिन्ह नसल्याने मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. दरम्यान आघाडीकडून शेकाप नेते विवेक पाटील आणि युतीच्या वतीने मनोहर भोईर यांच्या समोर बालदी यांनी आव्हान निर्माण केले आहे. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने हरेश केणी यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार कांतीलाल कडू या मतदारसंघात तयारी करीत आहेत. विविध प्रश्नावर आवाज उठवण्याबरोबर मोर्चा आंदोलन त्यांच्या नावावर आहेत. पनवेल करांची संस्कृती,कला व अध्यात्मिक गरज ओळखून विविध कार्यक्रमांचे आयोजन ते वर्षभर करतात. रक्तदान शिबिरापासून विद्यार्थ्यांचा गुणगौरव हे
सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. पनवेल चा महागणपती हा गणेशोत्सव सुद्धा कडू साजरा करतात. त्यांनी काँग्रेसकडून पनवेल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. परंतु येथे शेकापने आपला उमेदवार उभा केला. त्यामुळे कडू यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सुद्धा शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. वास्तविक पाहता अनेकदा अपक्ष उमेदवारांची फारशी दखल घेतली जात नाही. परंतु उरण आणि पनवेल मधील शिट्टी या निवडणूक चिन्हाची दखल प्रस्थापितांना तसेच प्रमुख उमेदवारांना घ्यावी लागणार हे तितकेच सत्य असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

कशी वाजवणार की शिट्टी !
दरम्यान महेश बालदी आणि कांतीलाल कडू यांच्या प्रचाराला बडे आणि मोठे नेते येणार नाहीत. या दोन्ही उमेदवारांची प्रचाराची धुरा ही स्वतःकडेच राहणार आहे.ते प्रतिस्पर्धी उमेदवारांना हे अपक्ष आव्हान देणारच. त्याकरीता ते पनवेल आणि उरणमध्ये शिट्टी कशी वाजवताहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.