स्टॅम्प बारामतीतून… नोटरी पुण्याहून.. अन उमेदवारी कर्जत जामखेड मधून

 

 


रोहित पवार यांचे प्रतिज्ञापत्र भाजप कडून ट्रोल
जामखेड प्रतिनिधी: – रोहित पवार हे बाहेरचे उमेदवार असल्याचा मुद्दा भारतीय जनता पक्ष प्रभावीपणे पटवून देण्यास यशस्वी झाला आहे. पवार यांनी प्रतिज्ञा पत्रा करिता स्टॅम्प बारामती येथून खरेदी केला आहे. तर नोटरी पुण्यातून केली आहे. आणि उमेदवारी मात्र कर्जत जामखेड मधून घेतली आहे. मग पवार यांचा स्थानिक वकिलांवर भरोसा नाही का? असा सवाल करीत त्यांचे हे प्रतिज्ञापत्र प्रा राम शिंदे यांच्या समर्थकांनी ट्रोल केले आहे.

अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शरद पवार यांचे नातू रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे. राष्ट्रवादीने बाहेरून उमेदवार आयात केला असल्याची टीका सुरुवातीपासून होत आहे. लोकसभा निवडणुकीत बाहेरचा नको घरचा हवा या अशा चा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगर दक्षिण मध्ये केला होता. या माध्यमातून डॉ सुजय विखे यांना टार्गेट करण्यात आले होते. हाच मुद्दा घेऊन संग्राम जगताप यांना खासदार करण्याचे आवाहन आघाडीकडून करण्यात आले होते. आता हिम्मत असेल तर असे फलक लावून दाखवा असे प्रतिआव्हान खासदार सुजय विखे यांनी कर्जत येथील सभेत विरोधकांना केले. एम एच -16 विरुद्ध एम एच -12 असा प्रचार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगला आहे. रोहित पवार यांची प्रचार यंत्रणा बारामती आणि पुणे येथून चालवली जात आहे. पुणे येथील संपर्क कार्यालयातून कार्यकर्त्यांना फोन केले जात असल्याचे ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. दरम्यान बाहेरचा उमेदवार हा शिक्का पुसावा यासाठी रोहित पवार यांनी कर्जत येथे जमीन खरेदी केली आहे. जमीन विकत घेतली म्हणून कोणी स्थानिक होत नाही. यासाठी या मातीत जन्मावा लागतो असा टोला पालकमंत्री प्रा राम शिंदे आपल्या भाषणातून लगावत आहेत. दरम्यान त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र करिता स्टॅम्प बारामती येथून खरेदी करण्यात आला आहे. तर नोटरी पुणे येथून करण्यात आली आहे. यावरून पवार यांचा कर्जत आणि जामखेड मधील वकिलांवर भरोसा नाही काय? असा मिस्कील सवाल प्रा . राम शिंदे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर केला आहे.