पुन्हा आणुया आपले सरकार ….

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा

खारघरमधील प्रचार सभेला उर्स्फूत प्रतिसाद

पनवेल/प्रतिनिधी- पनवेल, बेलापुर, ऐरोली आणि पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ खारघरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात झालेले विकास कामे, योजना गुंतवणुकीचा आढावा घेत पुन्हा आणुया आपले सरकार असा नारा त्यांनी दिली. यानिमित्ताने मोठया प्रमाणात गर्दी जमली होती.

सेंट्रल पार्कच्या बाजुच्या मोकळया मैदानावर पार पडलेल्या या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे, गणेश नाईक, रविंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, महापौर  डाँ कविता चौतमोल, आमदार निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील उपस्थित होते. दिल्लीत देवेंद्र आणि मुंबईत नरेंद्र फाँरमिला सुपहिट ठरलेला आहे. एक आणि एक दोन नाही तर आकरा होतात. नरेंद्र आणि देवेंद्र हे डबल इंजिन मोठया ताकतीने  देश आणि महाराष्ट्राला विकासाच्या क्षितीजावर घेवून जाणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात जी विदेशी गुंतवणुक झाली त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक झाली. पायाभूत सुविधांच्या बाबतीतही हे राज्य आघाडीवर राहिले. भविष्यात भारतात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणुक होणार आहे. त्यामध्ये आपले राज्य मोठे लाभार्थी असेल असे ही ते म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल. या परिसरात मेट्रो धावणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. भविष्यात या भागात मोठया प्रमाणात प्रकल्प येतील यातून रोजगार उपलब्ध होईल. भविष्यात कोकण परिसर हा आर्थिक हब होणार असल्याचेही भाकित मोदी यांनी वर्तवले. शहरीकरण होत असेल तर बिल्डर माफिया आलेच मात्र हा माफिया राज साफ करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. प्रामाणित बिल्डरांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे राहील असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेंर्तंगत  मोठया प्रमाणात घरांची निर्मिती केली जात आहे. एकटया पनवेलमध्ये दोन लाख घरे उभारली जात असल्याचेही ते म्हणाले. पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ही शहरे भविष्यातील महत्वाची विकास केंद्र असतील असेही पंतप्रधानांनी सांगितले. दिल्लीत ज्या प्रमाणे नरेंद्राचे सरकार आणले त्याप्रमाणे मुंबईत देवेंद्र सरकार आणा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दोन दिवस सुट्टी असल्याने मतदारांना विक एंडला न जाता मोठया संख्येने मतदान केंद्रावर जावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावीत असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले.