दाक्षिणात्य पोशाखात दक्षिण भारतीयांशी संवाद

 

 

आ. प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना जिंकले.
नवीन पनवेल येथे प्रचार सभेला उस्फूर्त प्रतिसाद.
पनवेल/ प्रतिनिधी: – भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण भारतीय सेलच्या वतीने गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता. यानिमित्ताने दाक्षिणात्य पोशाख परिधान करून आ. ठाकूर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. येत्या 21 तारखेला दक्षिण भारतीय बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
पनवेल कॉस्मोपॉलिटन विधानसभा मतदारसंघ आहे. मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामध्ये दक्षिण भारतीयांची संख्याही मोठी आहे. एकूण मतदारांमध्ये दहा टक्के हे मूळ दक्षिणेकडील राज्यातील आहेत. दरम्यान संतोष शेट्टी हे नवीन पनवेल मधून सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असणाऱ्या संतोष शेट्टी यांनी पनवेल नगर परिषदेचे उप नगराध्यक्षपदही भूषवले आहे. त्याचबरोबर भास्कर डी शेट्टी, भास्कर वाय शेट्टी हे गेल्या दीड दशकांपासून आ. ठाकूर यांच्यासोबत आहेत. त्यांच्याकडे पक्षाचे शहर उपाध्यक्ष पद आहेत. याव्यतिरिक्त अनेक दक्षिण भारतीयांना संघटनेचे सामावून घेण्यात आले आहे. दरम्यान गेली दोन टर्म मूळ दक्षिण भारतीय मतदारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना कौल दिला. ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावून येथील नागरिकांच्या संपर्कात असतात. विधान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी नवीन पनवेल येथील शांतिनिकेतन शाळेच्या मैदानावर दक्षिण भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. ठाकूर यांनी सफेद लुंगी आणि खादी शर्ट परिधान करून उपस्थितांना आपलेसे केले. त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधत यावेळीही आपल्या विजयामध्ये वाटेकरी होण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, भास्कर शेट्टी त्याचबरोबर दक्षिण भारतीय सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पनवेल परिसरातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.