पनवेलमध्ये शेकापचा पायाभूत सुविधांचा वचननामा

मुबलक पाणी, आरोग्य, सुरळीत वाहतूक आणि दर्जेदार सुविधांचा समावेश
नाना करंजुले
पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार हरेश मनोहर केणी यांनी आपला वचननामा मतदारांच्या हाती दिला आहे. त्यामध्ये मुबलक व शुद्ध पाणी, महिलांना स्वयंरोजगार, सुरळीत वाहतूक, दर्जेदार आरोग्य सुविधा, अत्याधुनिक शिक्षणासह इतर मूलभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. हा जाहीरनामा सर्वसमावेशक असल्याचा दावा शेकापचे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी केला आहे.
शेतकरी कामगार पक्षाने नगरसेवक हरेश मनोहर केणी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मिश्र लोकवस्ती असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात कॉस्मोपॉलिटन मतदारांची संख्या दखलपात्र आहे. महापालिका आणि ग्रामीण भाग पनवेल मतदार संघात येतो. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला हा विधानसभेचा मतदारसंघ आहे. येथे साडेपाच लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. येथील प्रश्न त्याचबरोबर मूलभूत सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरी कामगार पक्षाने पनवेल करिता जाहीरनामा तयार केला आहे. सध्या भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नांवर उपायोजना ची मात्रा वचननाम्यात दिसून येत आहे. 24 तास सात दिवस पनवेल विधानसभा क्षेत्रात पाणी पुरवठा करण्याकरीता देहरंग धरणाची क्षमता वाढवणे. वाजेपुर, मोरबे, हौशाची वाडी, ऊसरण, भेकरे, तळोजा या धरणांचा विकास करणार असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. एमआयडीसीमधील बारवी धरणात पाणी आणणार असल्याचेही वचन देण्यात आले आहे. हेटवणे, बाळगंगा या धरणातील सिडकोच्या हिश्‍श्‍याचे पाणी पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करणे, तलावांचे सुशोभीकरण करून पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यासाठी सर्व सोसायट्यांना प्रवृत्त करून त्यांना अनुदान मिळवून देणे. परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष संपवण्यासाठी जुन्या विहिरी व तलावांचे पुनरुज्जीवन करणे आधी गोष्टींचा वचननाम्यामध्ये समावेश आहे. महिलांना घरच्या घरी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. वस्तीगृह आणि अद्यावत पाळणाघरांची निर्मिती करणे, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची ग्वाही शेतकरी कामगार पक्षाने दिली आहे. पनवेल परिसराला वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या भेडसावत आहे. यावरही उमेदवार हरेश मनोहर केणी यांनी दृष्टीक्षेप टाकला आहे. मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सुसज्ज बस स्थानक व बस थांबे तयार करून ते रेल्वेस्थानकाला जोडणार, बहुमजली वाहनतळ उभारणार, फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून पदपथ आणि रस्ते मोकळे करणार. सिडको वसाहती अवजड वाहन मुक्त करणार. तसेच ही वाहने उभी करण्यासाठी दहा एकर जागेवर नवीन पार्किंग झोन उभारणार असल्याचेही त्यामध्ये उल्लेख आहे. सर्व नोडस मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा केंद्र उभारण्यात येईल. तसेच क्रीडांगणे, मैदान आणि उद्यानांचा विकास करण्यात येईल. खारघर येथील सेंटर पार्कमध्ये ॲम्युझमेंट पार्क उभारणार.तसेच नवोदित कलाकारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची ग्वाही हरेश मनोहर केणी यांनी दिली आहे. मतदारसंघातील आरोग्याच्या सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आले आहे. अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी, वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय उभारण्या बरोबरच मनशक्ती आणि विपश्यना केंद्र उभारणार असल्याचेही वचननाम्यात म्हटले आहे. यामध्ये शिक्षणावरही नजर टाकीत शैक्षणिक संकुलाच्या नफेखोरीला आळा खालून दर्जेदार शिक्षण माफक शुल्कामध्ये मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. पाळणाघरे, पूर्वप्राथमिक शाळांवर नियंत्रण या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार असल्याचे शेकापच्या उमेदवाराने म्हटले आहे. युवकांना रोजगाराभिमुख व्यवसाय व भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. अल्प उत्पादन गटातील विद्यार्थ्यांकरता स्पर्धा परीक्षा करतात मदत केली जाईल. पनवेल विधानसभा मतदारसंघात सुसज्ज ग्रंथालय वाचनालय अशी निर्मिती करणार असल्याचेही वचननाम्यात उल्लेख आहे.

विविध नागरी सेवांवर लक्ष केंद्रित करणार
महापालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करून त्यावर खत आणि ऊर्जा निर्मिती करण्याकरीता पाठपुरावा केला जाईल. सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा कराचा बोजा कमी करण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांची कामे सिडकोकडून करून घेणार असल्याचे अभिवचन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. वाय फाय झोन तयार करण्याबरोबरच ज्येष्ठांसाठी मदत केंद्र, नाना नानी पार्क आणि सभागृह उभारण्याचे सुद्धा वचन देण्यात आले आहे.

सर्वांगीण प्रगतीचा शब्द

खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज कलादालन उभारण्याची ग्वाही देण्यात आली आहे. पनवेल परिसरात भव्यदिव्य स्वरूपाचे वारकरी भवन उभारण्यात येईल. सुसज्ज असे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार भवन, संत शिरोमणी रोहिदास महाराज विचार भवन, यासारख्या वास्तू उभारण्यात येतील .पत्रकारांसाठी पत्रकार भवन तसेच घरकुल योजना राबवण्याचा शब्द शेतकरी कामगार पक्षाने आपल्या वचननाम्यात दिला आहे.