महेश बालदींची ताकत.. पक्षात अन.. जनतेतही

 

उरणमध्ये अपक्ष लढून जिंकले

विवेक पाटील आणि मनोहर भोईर यांचा केला पराभव

नाना करंजुले

पनवेल/प्रतिनिधी- महेश बालदी यांची भारतीय जनता पक्षात ताकत असल्याचे अनेकदा दिसून आले होते. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून त्यांनी मनोहर भोईर आणि विवेक पाटील या दोघा  तगडया प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करून विजय संपादन करीत उरणमध्ये आपली ताकत दाखवून दिली.त्यांच्या विजयाने पनवेल उरण परिसरातील राजकिय समिकरण सुध्दा बदलेले आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघाचा विचार करीत असता यामध्ये तीन तालुक्यांचा समावेश आहे. स्थानिक मतदारांची प्रभाव जास्त आहे. शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील, आणि सेनेचे मनोहर भोईर यांची ताकत या मतदारसंघात आहे. महेश बालदी सुध्दा गेल्या अनेक वर्षापासून उरणच्या राजकारणात आहेत. परंतु ते शहरापुरते मर्यादीत होते. मागील विधानसभा निवडणुकीत बालदी भारतीय जनता पक्षाकडून निवडणुक लढले होते. ते चौथ्या  क्रमांकावर होते. परंतु त्यानंतर त्यांनी या मतदारसंघाची बांधणी केली. येथे पक्ष वाढविण्याकरीता परिश्रम घेतले. भाजप आणि शासनामध्ये असलेले आपले वजन वापरून येथे काही विकास कामे केले, निधी आणला. मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवत असताना विधानसभेची तयारी सुरू केली. गेल्या काही महिन्यात त्यांनी शेकाप व सेनेला सुरूंग लावला. त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात घेतले. दरम्यान सेना व भाजप युती झाली आणि जागा सेनेच्या वाटेवर गेली. महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कोणत्या परिस्थिती निवडणुक लढवून आमदार व्हायचे असा पण त्यांनी केला. त्याप्रमाणे प्रचार सुध्दा उरण विधानसभा मतदारसंघात केला. विशेष म्हणजे त्यांच्यावर पक्षाने बंडखोरी केली म्हणून कारवाई केली नाही. तसेच भाजपची संपुर्ण ताकत त्यांच्या पाठीमागे राहिली. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर हे प्रचाराला गेले नसले तरी त्यांची अप्रत्यक्ष मदत बालदी यांना झाल्यांचे दिसून आले. तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी आपण माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा हनुमान म्हणून येथे आलो आहे. आपले जे ठरले आहे त्याप्रमाणे महेश बालदी यांनाच मतदान करायचे आणि आपली  ताकत दाखवून दया असे जाहीरपणे आवाहन केले होते. बालदी सुध्दा साम दंड भेद नुसार निवडणुकीला सामोरे गेले. एकाही बडया नेत्याची  त्यांच्या मतदारसंघात सभा झाली नाही. स्वताःच स्टार प्रचारक म्हणून ते रिंगणात उतरले. विकासाच्या मुद्दयावर मतदारांना त्यांनी आपलेसे केले. प्रत्येक आघाडयांवर महेश बालदी दोनही उमेदवारांपेक्षा सरस ठरले. ते बाहेरचे आहेत असा प्रचार विरोधी बाजुने झाला.स्थानिक उमेदवारांनाच निवडूण दया असे आवाहन आणि प्रचार सुध्दा झाला. मात्र उरण विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. परिणामी महेश बालदी यांचा विजय झाला आणि त्याचे आमदारकीचे स्वप्न पुर्ण झाले.  

उत्तम निवडणुक व्यवस्थापन

महेश बालदी यांनी उत्तम निवडणुक व्यवस्थापन करीत आपला प्रचार केला. भारतीय जनता पक्षाने केलेल्या कामांचे ब्रँडिंग केले. शिट्टी हे निवडणुक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवले. नियोजनबध्द प्रचार करीत बालदी यांनी निवडणुक जिंकत आपली ताकत दाखवून दिली.