शेकापचा आवाज  विधानसभेच्या बाहेर

 

रायगड जिल्हयातील चारही जागा गमावल्या

अलिबाग, पेणच्या गडात शिवसेना भाजप

नाना करंजुले

पनवेल/प्रतिनिधी- एकेकाळी प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा या निवडणुकीत सर्वच मतदारसंघात पराभव स्विकारावा लागला. रायगड जिल्ह्यातील चारही जागा लालबावटयाने गमावल्या. तसेच सांगोल्यातही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे या पक्षाचा बुलंद आवाज  विधानसभेच्या बाहेर गेला आहे. उर्जीत अवस्था प्राप्त करण्याचे मोठे आव्हान शेकापसमोर असणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाची भूमिका सातत्याने महत्वाची राहिली. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला आव्हान देण्यात लालबावटा कधीही मागे सरकला नाही. शेतकरी, कष्टकरी आणि कामगाराकडे संघर्ष करणारे शेकापची  पालेमुळे राज्यात रूजले होते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर कोकणातील रायगड जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव होता. डाव्या विचारसरणीच्या या संघटनेतून अनेक नेतृत्वाचा उदय झाला. त्यांनी राज्याचे राजकारण काही वेळा  हलवले. गणपतराव देशमुख , एन.डी पाटील, दत्ता पाटील, दि.बा पाटील, दत्तूशेठ पाटील, मिनाक्षीताई पाटील, विवेक पाटील, धैर्यशील पाटील, पंडीत पाटील यांनी सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत बुलंद केला. आंदोलन, शेतकरी कामगार पक्ष आणि जनसामान्य हे समिकरण कायम राहिले. सिडको, एसईझेड, टोल  विरोधातील आंदोलनाचा दरारा आजही कायम आहे. गणपतराव देशमुख हे या वेळी सांगोला येथून निवडणुक लढले नाहीत. त्याचबरोबर आजारपणानंतर माजी आमदार विवेक  पाटीलमधून निवडणुक लढले.मात्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी बाजी मारली. पनवेल विधासभा मतदारसंघात आपेक्षेप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांनी 91 हजार पाचशे मतांनी जिंकले. पेणमध्ये धैर्यशील पाटील हे मागील दोन टर्म आमदार होते. परंतु माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपचे कमळ हातात घेवून निवडणुक लढवली आणि येथे विजय संपादन केला. त्यांनी  व शेकापने येथील गड गमवाला. अलिबाग आणि शेकापचे गेली अनेक वर्ष समीकरण होते. परंतु या ठिकाणी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी बाजी मारली. परिणामी रायगड जिल्ह्यात युतीने शेकापला व्हाईट वाँश दिल्याचे दिसून आले. त्यामुळे शेकापच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाचा आमदार विधानसभेत नसणार आहे. लालबावटयाचा आवाज सभागृहात घुमणार नाही.  

पक्षाला उभारी देण्याचे मोठे आव्हान

शेतकरी कामगार पक्षाला उर्जीत अवस्था प्राप्त करून देणे. त्याचबरोबर पराभूत मानसिकतेतून कार्यकर्त्यांना बाहेर काढणे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वसमोर असणार आहे. त्या अनुषंगाने या सर्व परिस्थिती शेकाप कसा सामोरे जातोय यावर बरेच काही अवलंबून आहे.