विखे भाजपात गेले आणि आघाडीला चांगले दिवस आले

 

 

 

दोन्ही काँग्रेसला  अहमदनगरमध्ये मिळाली उभारी 
व्हाईट वॉश ची भाषा मतदारांना रुचली नाही
नाना करंजुले
अहमदनगर /प्रतिनिधी: – सहकार आणि काँग्रेसचा गड असलेल्या अहमदनगर मध्ये महायुतीने विशेषता भाजपने पाच वर्षांपूर्वी मुसंडी मारली होती. विखे आणि थोरात हे एकाच पक्षात असताना कमळा ने ही किमया साधली होती. राधाकृष्ण विखे पाटील पक्षात आल्याने जिल्ह्यात आणखी ताकत वाढेल असा कयास लावला जात होता. 12 आणि शून्य चा दावा खासदार डॉ सुजय विखे यांनी केला होता. परंतु तो फोल ठरवत आघाडीने 9 जागा घेत महायुतीला व विखे यांना चपराक दिली. ते गेले आणि आघाडीला चांगले दिवस आले अशा प्रतिक्रिया नगरमध्ये उमटल्या आहेत.
अहमदनगर , सहकार आणि काँग्रेस असे तिहेरी समीकरण नेहमी पहावयास मिळाले. काँग्रेस व राष्ट्रवादीचे या जिल्ह्यात सातत्याने प्रभावी राहिले. बाळासाहेब विखे पाटील यांच्या बरोबरच शरद पवारांनाही मानणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला येथे जास्त वाढता आले नाही. तसेच प्रभाव सुद्धा पाडता आला नाही. नगर जिल्हा कर्जत-जामखेड वगळता सातत्याने दोन्ही काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहिला. परंतु गेल्या दशकभरात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. प्रा. राम शिंदे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी पक्षाला बळ देण्याचे काम केले. प्रा. शिंदे जिल्हाध्यक्ष असताना याठिकाणी भाजप वाढवण्याकरीता विशेष परिश्रम घेतले.2014 ला कर्जत-जामखेड बरोबरच राहुरी, शेवगाव, कोपरगाव आणि नेवासा येथे भाजपाचे कमळ फुलले. याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अगोदर डॉ सुजय विखे भारतीय जनता पक्षात आले. आणि नगर दक्षिण मधून खासदार सुद्धा झाले. त्यांच्यासाठी युतीच्या सर्व आमदार व पालकमंत्र्यांनी घाम गाळला. आणि डॉ. सुजय यांना निवडून आणले. त्यानंतर विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचे काम हातात घेतले. मंत्रिमंडळ विस्तारात विखे नवे गृहनिर्माण मंत्री झाले. त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाला बळ मिळेल. विधानसभेमध्ये नगर जिल्ह्याचे पाठबळ मिळेल अशा प्रकारचा कयास लावण्यात आला होता. परंतु नगर जिल्ह्यात शिवसेनेबरोबरच भारतीय जनता पक्षाची मोठी पिछेहाट झाली. विशेष करून नगर दक्षिणमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा , शेवगाव वगळता बाकी ठिकाणी महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले. मी नगर जिल्ह्यात 12 व 0 करून दाखवतो असे डॉ सुजय विखे ठीक ठिकाणी सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष सुजय यांनी सिंहगर्जना केली होती. परंतु आघाडीचा पराभव झाला नाही. मात्र युतीला फक्त तीनच जागेवर समाधान मानावे लागले. तेही उमेदवारांनी आपली वैयक्तिक टाकत लावल्याने ते शक्य झाले.

बाळासाहेब थोरात यांचे भाकीत खरे ठरले
राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडून गेल्यानंतर पक्षाला नुकसान होणार नाही. उलट जिल्ह्यात नव्या लोकांना संधी मिळेल. आणि आघाडी उभारी घेईल असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वर्तवले होते. आणि ते गुरुवारी लागलेल्या निकालाने तंतोतंत खरे ठरले.

विखेंची मदत किती झाली?
दरम्यान बाराही विधानसभा मतदारसंघात विखे कुटुंबीयांची ताकत आहे. त्यांचे स्वतःचे मतदान आहे. विखे यांच्या आदेशानुसार ती वोट बँक काम करते. लोकसभा निवडणुकीत डॉ सुजय यांच्या विजयात हे समीकरण महत्त्वाचे ठरले. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला या मतांचा किती फायदा झाला याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.