पनवेल महानगरपालिकेत पुन्हा महिलाराज

 

 


चारुशीला घरत यांचे नाव आघाडीवर
लीना गरड , नेत्रा पाटील महापौरपदासाठी चर्चेत
पनवेल प्रतिनिधी: पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाल्याने मनपात पुन्हा महिलाराज अस्तित्वात येणार आहे. माजी उपमहापौर चारुशीला घरत यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर खारघर मधील लीना गरड आणि नेत्रा किरण पाटील यांनाही महापौरपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लॉबिंग करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका महत्वाचे ठरणार आहे.
पनवेल महानगरपालिका ऑक्टोबर 2016साली स्थापन झाली. मनपा आल्यानंतर याठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून सभागृहनेते परेश ठाकूर आणि शेकाप कडून विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत होते. परंतु अनुसूचित जाती महिला याकरिता आरक्षण जाहीर झाले. दरम्यान त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 16 मधून डॉ कविता किशोर चौतमाल यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले. त्यांनी विजय संपादन केला. भारतीय जनता पक्षाने डॉ चौतमोल यांना प्रथम महापौर होण्याची संधी दिली. दरम्यान मध्यंतरी शासनाने राज्यातील महापौर पदासाठी अडीच महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ही मुदत संपल्यामुळे या पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदाकरीता सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले आहे. त्यानुसार अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान माजी नगराध्यक्ष तथा माजी उपमहापौर चारुशीला घरत यांचे नाव पनवेलच्या महापौरपदाकरीता आघाडीवर आहे. त्याचबरोबर खारघर मधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील तसेच लीना गरड यांनाही भारतीय जनता पक्षाकडून पनवेलच्या प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नगरसेविका ऍड वृषाली वाघमारे यांनाही भारतीय जनता पक्षाकडून संधी दिली जाऊ शकते. ज्येष्ठ नगरसेविका सीताताई पाटील यांच्या तीन टर्मचा अनुभव विचारात घेऊन त्यांच्याही नावाबाबत पक्षनेतृत्व विचार करू शकते. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेवर एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाने प्रस्थापित केली आहे. त्यामुळे महापौर निवडीमध्ये त्यांची भूमिका महत्वाचे ठरणार आहे.