पारनेर -नगरच्या विकासाचे आमदारांकडून ऑडिट

 


आ. निलेश लंके यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दर्जाची केली पडताळणी
शासकीय अधिकाऱ्यांनाही घेतले सोबत
पारनेर प्रतिनिधी: – पारनेर – नगर मध्ये झालेली आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांची आमदार निलेश लंके यांनी प्रत्यक्ष शनिवारी पाहणी केली. दर्जाचे पडताळणी करून त्यांनी एक प्रकारे ऑडिटच केले. विशेष म्हणजे त्यांच्यासमवेत अधिकारीसुद्धा उपस्थित होते. आ. लंके यांनी कामांचा दर्जा राखण्याचे यावेळी स्पष्ट सुचित केले.
शासकीय योजना, निविदा, एजन्सी ला वर्क ऑर्डर आणि नारळ फोडणे हा एक कलमी कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू असतो. मग संबंधित ठेकेदार नियमानुसार अटी आणि शर्ती चे पालन करतो का?. त्याचबरोबर त्या कामामध्ये कोणत्या दर्जाचे साहित्य वापरतो. याकडे ना फारसे लोकप्रतिनिधी लक्ष देतात. ना त्या खात्याचे अधिकारी, त्यापैकी बहुतांशी जन ठेकेदाराची अभद्र युती करून बिल काढण्यात व्यस्त असतात. संबंधित लोकप्रतिनिधीही आम्ही हे विकास काम केले तो विकास केला असा टंका मिरवतात . मात्र या कामांच्या दर्जाकडे फारशी कोणी लक्ष देत नाही. याला पारनेर तालुका अपवाद नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम होऊनही सहा महिन्यात त्याची दुरावस्था झाल्याचे कित्येक गावांमध्ये दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चे निर्वाचित आमदार निलेश लंके सध्या सुरू असलेल्या आणि या अगोदर झालेल्या विकासकामांची पाहणी केली. आणि ते ही संबंधित विभागाचे अधिकारी सोबत घेऊन.यावेळी अनेक कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे आढळून आले.तसेच येथील रस्त्यांची अल्पावधीतच झालेल्या दुरावस्थेबाबत आमदार निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली

दर्जाबाबत कुठलीही तडजोड नको
यापुढील काळात वाडी-वस्तीवर दळणवळणाचे मुख्य साधन असणारा मुख्य रस्ता पोचवायचे व उत्कृष्ट कामाचा दर्जा देणाऱ्या ठेकेदारांनाच यापुढे काम मिळणार. कामाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड चालणार नाही.असे आमदार निलेश लंके यांनी अधिकारी व ठेकेदारास निक्षून सांगितले.

ठराविक ठेकेदारांचे हितसंबंध
ठराविक ठेकेदारांनी आपले हितसंबंध जपत तालुक्यात रस्त्यांची व इतर कामे केले.त्यामुळेच अनेक ठिकाणी रस्त्यांचा दर्जा खालावला आहे. अशी खंत यावेळी आ. लंके यांनी व्यक्त केली.परंतु या पुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही.

पारनेर नगर विकासाचे रोड मॉडेल असेल
शासनाचा येणारा सर्वाधिक निधी आणण्याचा प्रयत्न तर मी करणारच आहे.परंतु या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करत महाराष्ट्राच्या इतिहासात पारनेर नगर तालुक्याची ओळख एका वेगळ्या पद्धतीने करून देणार असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.