कामोठे वसाहतीत मलनिःसारण वाहिन्या तुंबल्या

प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारींसह पदाधिकारी आक्रमक
पनवेल -कामोठे वसाहतीतील मलनिःसारण
वाहिन्या अनेक ठिकाणी तुंबल्या आहेत. सिडकोकडून त्यांची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे जिकडेतिकडे मलमिश्रीत रस्त्यावर वाहत आहेत. म्हणून कामोठे करांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी थेट कार्यालयावर धडक मारली. प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी यांच्यासह पदाधिकारी आक्रमक झाले. याबाबत त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करा. अन्यथा रहिवाशांना घेऊन रस्त्यावर उतरा असा सज्जड इशारा गोवारी यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिला.
कामोठे वसाहती ची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे सांडपाणी निर्माण होत आहे. दरम्यान मलनिस्सारण वाहिन्यांच्या देखभालीकडे सिडकोकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांची वेळोवेळी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्या आहेत. त्यामध्ये कचरा गेल्याने पाणी पुढे वाहून जात नाही. परिणाम सातत्याने चेंबरमधून मलमिश्रित पाण्याची गळती सुरू आहे. याचा त्रास काम करणारे कर्मचारी, इमारतीतील रहिवासी, पादचारी व वाहन चालकांना होत आहे. 
चोवीस तास पंपिंग करून वसाहतीतील सांडपाणी खेचावे लागते. त्याकरिता महिन्याला लाखो रूपये खर्च सिडकोला करावा लागतो, तरी सुध्दा वाहिन्या सातत्याने तुंबल्या जात आहेत. 
त्या अनुषंगाने या संदर्भात कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी कामोठे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कामोठेवासीयांच्या वतीने केली आहे.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी यांच्या नेतृत्वाखाली, पनवेल जिल्हा सरचिटणीस अजिनाथ सावंत, कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले, कामोठे शहर कार्याध्यक्ष अमोल बोडके, कामोठे शहर सरचिटणीस शैलेश लोंढे, शहर युवक अध्यक्ष राहुल यमगरणी , प्रकाश आंगणे त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सिडको कार्यालय गाठले. आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
चौकट
हाय  फ्लो डिसिल्टिंग पंपाचा वापर करा
दरम्यान सध्या सिडकोकडे जे पंप आहेत. त्याची क्षमता कमी आहे. त्याचबरोबर प्रेशर ही कमी आहे. त्यामुळे मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये अडकलेला कचरा बाहेर निघत नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे इटालीयन तंत्रज्ञानाने तयार केलेल्या हाय  फ्लो डिसिल्टिंग पंपाचा वापर सुरू करून मलनिस्सारण वाहिन्या प्रवाहीत कराव्यात अशी मागणी गोवारी आणि सावंत यांनी केली.
.