नवी मुंबई पोलीसांच्या  तपास कौशल्याचे महासंचालकांकडून कौतुक  

 

 

कळंबोली बॉम्ब प्रकरणाचा छडा लावणाऱ्या तीन टीमला सहा लाखांचे बक्षिस

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल  उंचावले

नाना करंजुले 

पनवेल /प्रतिनिधी- कळंबोली सुधागड हायस्कुलसमोर  ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या  विशेष तपास पथकाने सलग सतरा दिवस अथक परिश्रम घेऊन जुलै महिन्यात  छडा लावला. या गुन्ह्यात क्लिष्टतेत बारकावे शोधत पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याची उकल केली. त्याचबरोबर आरोपींना जेरबंद करीत या पथकाने आपल्या कौशल्याचे खऱ्या अर्थाने प्रकटीकरण केले. त्याचबरोबर पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी  दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. याशिवाय जनतेचा विश्वास संपादन करीत गुन्हेगारांना एका अर्थाने जरब बसवला.या कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली आहे. एकूण तीन पथकांना सहा लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

 १७ जून रोजी कळंबोली सारख्या माथाडी कामगारांचे वास्तव असणाऱ्या वसाहतीत बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. एकंदरीतच मुंबईपासून जवळ असलेला हा परिसर दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचाही कयास लावला जात होता.अशाप्रकारे जिवंत बॉम्ब सापडण्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना होती. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आपल्या अधिकार्‍यांवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी या कामी विशेष पोलिस पथकाची स्थापना केली. त्या पथकामध्ये गुन्हे अन्वेषण आणि प्रकटीकरणात हातखंडा असलेले विजय कादबाने, संदिपान शिंदे या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सहाय्यक निरीक्षक म्हणून  नवी मुंबईत काम केलेले  आहे. त्यांच्या नावावर अनेक गुन्ह्यांची उकल नोंदली गेली आहे. त्याचबरोबर या परिसराची त्यांना खडानखडा माहिती होती. या सर्व गोष्टींचा फायदा तपासकामी उपयोगी पडला. याव्यतिरिक्त कोंडीराम पोपेरे, अजय कुमार लांडगे यांच्यासारखे अनुभवी अधिकारी या तपास पथकात होते. त्यांचा अनुभव या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपयोगी ठरला.

निवृत्ती कोल्हटकर, शिरिष पवार, राहुल राख, रूपेश नाईक, राजेश गज्जल, सुधिर निकम, विजय चव्हाण, संदीप गायकवाड , भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख,नितीन शिंदे हे अधिकारी सोबतीला होतेच. यामध्ये हेमंत सुर्यवंशी, स्नेहल जगदाळे, मंगल गायकवाड,  राजेश सोनवणे, बाबाजी थोरात, अनिल यादव, प्रकाश साळुंखे, उमेश नेवारे,वैभव शिंदे, मनोज चौधरी, उमेश ठाकूर, सचिन टिके या   पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपींनी हा गुन्हा करत असताना आपले तोंड झाकून ठेवले होते. त्याचबरोबर ज्या दुचाकीचा वापर केला त्याचा नंबर ही बनावट होता. पोलिसांनी लाखो सीसीटीव्ही फुटेज तपासले. सतरा दिवस  दोन  ते  तीन तासही   झोप घेतली नाही. या गुन्ह्यात वापरलेली  प्रत्येक वस्तू कुठून आणली याचा शोध पोलिसांनी घेतला. संशयित आरोपींची हजारो जणांना फोटो दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर ठाण मांडत वेगवेगळ्या शक्यतांची पडताळणी केली. याबाबत गुप्त माहिती सुद्धा घेण्यात आले. शेवटी पोलिसांनी सुशील साठे, मनीष भगत,दीपक दांडेकर या आरोपींना अटक केली. नवी मुंबई पोलीसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर राज्याच्या पोलीस महासंचालकाकडून  सीनोट आणि जीएसटी व बक्षिसांची रोख रक्कम सहा लाख रूपये जाहीर केली आहे.