पनवेल मनपाच्या महासभेतही मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सतीश पाटील यांची फटकेबाजी
पनवेले/ प्रतिनिधी
 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येणार… मी पुन्हा येणार हे वाक्य गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर  ट्रोल  होत आहे. त्याचबरोबर सद्य राजकीय स्थितीनुसार विरोधी पक्षही याबाबत विनोद करीत खिल्ली उडवत आहेत. त्याचा प्रत्यय पनवेल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सतीश पाटील यांनी मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार.. असा टोला लगावत… आता आमचे सरकार येणार असल्याचे सांगत संपूर्ण सभागृहाला हसवले.
आपल्या खुमागदार शैलीत सतीश पाटील यांनी बुधवारी पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत विविध प्रश्नांवर आवाज उठवला. हे करीत असताना ते टोलेबाजी करण्यातही विसरले नाहीत. पनवेल परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी लक्षवेधी सादर केली होती. गेल्या सहा महिन्यात एक हजारांपेक्षा जास्त जणांना सोनं स्वान दंश झाला. त्याचबरोबर पनवेल शहरात कुत्र्याने चावा घेण्याच्या घटना घडल्या. या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे नगरसेवक बुधवारी आक्रमक झाले. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाचे काय झाले ? असे नागरिक आम्हा नगरसेवकांना प्रश्न विचारीत आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न सतीश पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान निर्बीजीकरणासाठी  निवडणूक आचारसंहितेमुळे एजन्सी नियुक्त करता आले नाही. त्यादरम्यान कुत्रे इतके चवचाळतील असे वाटल नव्हते असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगताच. कुत्रे निवडणुकीच्या अगोदरच चवताळले होते असा टोला पाटील यांनी लगावताच एकच हशा पिकला. अनधिकृत मोबाईल टॉवर बाबत झालेल्या चर्चेतही त्यांनी सहभाग घेत याबाबत धोरण ठरवण्याची मागणी केले. त्याचबरोबर ज्या रोडवर नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्याबाबत त्वरित चौकशी करावी अशी महत्वपूर्ण मागणी ही सतीश पाटील यांनी सभागृहात केली. अन्यथा आमचे सरकार आल्यानंतर या कामाची चौकशी लावू असेही ते म्हणाले. विरोधी पक्षाकडून गुरुनाथ गायकर, डॉ. सुरेखा मोहकर, बबन मुकादम यांच्यासह इतर नगरसेवकांची साथ मिळाली.