मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतेची जबाबदारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे

जीवनदायी भवन येथे गरजूंना अर्ज करता येणार
मुंबई /प्रतिनिधी:- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीमधून  वैद्यकीय मदत देण्याबाबत अडचणी येत होत्या. दरम्यान ही जबाबदारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. वरळीतील जीवनदायी भवन येथे गरजूंना अर्ज करता येतील. याबाबत बुधवारी शासन निर्णय जारी करण्यात आला.
मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठ्या प्रमाणात रुग्णांना वैद्यकीय मदत दिली जात होती. त्यामुळे लाखो जणांना गेल्या पाच वर्षात दिलासा मिळाला. त्याचबरोबर त्यांना चांगल्या पद्धतीने वैद्यकीय उपचार घेता आले. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्य शासन अस्तित्वात नसल्याने मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय मदत देण्यात अडचणी येत आहेत. यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल झाल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही किंवा उपाययोजना कराव्यात अशी विनंती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. तसेच विधानपरिषदेचे  माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनीही या आशयाचे पत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ . शिंदे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना अतिशय प्रभावीपणे राज्यात राबवली. सर्वसामान्य रुग्णांना या योजनेतून न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या योजनेत कमालीची पारदर्शकता आणत शासनाचे कोट्यावधी रुपये  वाचवले. या पार्श्वभूमीवर डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जनआरोग्य योजनेतील 151 समान उपचार पद्धती वगळून उर्वरित आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याकरता अर्जाची छाननी केली जाईल. आवश्यक कागदपत्रे व पात्रता तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ल समिती पात्र अर्जांची शिफारस करेल. याकरता आवश्यक असलेले मनुष्यबळ अप्पर मुख्य सचिव यांनी उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आहे. यासाठी जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका वरळी मुंबई 400018 दूरध्वनी क्रमांक 022-24999203/04/05 या या ठिकाणी वैद्यकीय मदती करता गरजूंनी अर्ज करावेत असे कळविण्यात आले आहे.