कळंबोलीतील शेकडो शिवसैनिकांची तहसील कार्यालयाकडे कुच

महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली घोषणा
पनवेल प्रतिनिधी:-अतिवृष्टीमुळे राज्यातील इतर भागाबरोबरच पनवेल परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी. या मागणी करीता शिवसेनेकडून सोमवारी पनवेल तालुका तहसील कार्यालयाकडे मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान याकरीता महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतुन शेकडो शिवसैनिकांनी तहसीलकडे सकाळी दहा वाजता आगेकूच केली.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. एक प्रकारे ओल्या दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास पावसात वाहून गेला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. त्याला पनवेल तालुका सुद्धा अपवाद ठरला नाही. राज्यपालांनी जी मदत जाहीर केली. ती तुटपुंजी असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार सोमवारी राज्यभर अनेक ठिकाणी शिवसेनेने मोर्चे काढून आंदोलन पुकारले आहे. त्या अनुषंगाने कळंबोली बीमा संकुल येथून रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक पनवेल कडे रवाना झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई करिता तहसीलवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे पनवेल तहसील कार्यालयावर शिवसैनिक हजारोंच्या संख्येने धडकणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.