अहमदनगरच्या दोन आमदारांनी सभागृह जिंकले

 

 

रोहित पवार, निलेश लंकेची अनोखी शपथ
मातृ पितृ देवो भव आणि राम कृष्ण हरी चा नामोल्लेख
नाना करंजुले
मुंबई /प्रतिनिधी: – बुधवार नवनिर्वाचित आमदारांचा विधान भवनात शपथ विधी पार पडला. यामध्ये रोहित पवार यांनी आपल्या नावा पाठीमागे वडिलांबरोबरच आईचाही नामोल्लेख करील मातृ- पितृ देवो भव चा संदेश. तर निलेश लंके यांनी शपथविधीनंतर राम कृष्ण हरीचे नामस्मरण करीत आपल्यातील वारकऱ्याचे दर्शन घडवले. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार अहमदनगर जिल्ह्याचे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रोहित यांच्या विजयात आजोबांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांनीही परिश्रम घेतले. वडील राजेंद्र पवार हे कधीही व्यासपीठावर दिसले नाहीत. मोठ मोठ्या सभांना ते सर्वसामान्यांमध्ये बसत असत. आपल्या मुलाला आमदार करण्याकरता त्यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला. त्याचबरोबर रोहित यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचाही त्यांच्या विजयात मोलाचा वाटा आहे. सुनंदाताई आपल्या मुलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. परिणामी रोहित यांच्या रूपाने पवारांची तिसरी पिढी विधिमंडळात आली. दरम्यान आमदारकीची शपथ घेताना मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार अशी त्यांनी आपली ओळख सभागृहाला करून दिली. आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत प्रचलित आहे. परंतु पवार यांनी मातृ पितृ देव भवचा संदेश सभागृहाला दिला. शरद पवार यांचे संस्कार तसेच शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पुरस्कार करून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश या माध्यमातून रोहित पवार यांनी या निमित्ताने दिला. जनतेचे आमदार म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे, असे पारनेर नगरचे आमदार निलेश लंके हे आपल्या साधेपणा आणि दांडगा जनसंपर्क करिता ओळखले जातात. लंके यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा प्रत्यय आज पहिल्या दिवशी आला. विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेताना त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर सभागृहाकडे पाहून राम कृष्ण हरी असं म्हणत समारोप केला. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेले निलेश लंके हे अनेक वर्ष वेगवेगळ्या दिंड्या तसेच हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन हरिनामाचा जप करताना दिसले आहे. त्यांच्यातील वारकरी बुधवारी महाराष्ट्राच्या विधिमंडळाला दिसला.