फडणवीसांच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतचे थोरातांचे भाकीत खरे ठरले

 


विखे यांच्या बाबतचे मतही तंतोतंत जुळले
नाना करंजुले
मुंबई /प्रतिनिधी: राजकीय तज्ञ, विश्लेषक हे राजकारणाबाबत काही गृहिते मांडतात आणि काही वेळा ते पुढे खरे ठरतात. परंतु एखादा राजकीय नेता विरोधकांवर टीका करताना भविष्यवाणी व्यक्त करतो ती केवळ विरोधासाठी असते. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी आरशासमोर उभे रहावे त्यात त्यांना महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता आपल्या रूपात दिसेल अशी भविष्यवाणी केली होती. मंगळवारी ती खरी ठरली. मावळत्या मुख्यमंत्र्यांची भाजपकडून विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतही नोंदवलेलं मत तंतोतंत जुळले.
गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. दरम्यान दोन्ही काँग्रेस मधून त्यांनी मोठ्या प्रमाणात इन्कमिंग करून घेतली. आता या निवडणुकीला मजाच उरली नाही. समोर विरोधीपक्ष मजबूत आहे का ? अशा प्रकारच्या वल्गना फडणवीसांनी प्रचारादरम्यान केल्या. त्याच बरोबर राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल असे प्रत्येक सभेत ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होते. दरम्यान अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले. त्यांच्या पद्धतीने त्यांनी पक्षाचे संघटनात्मक काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी आरशासमोर उभे राहावे. त्यात त्यांना महाराष्ट्राचा भावी विरोधी पक्ष नेता दिसेल अशा प्रकारची भविष्यवाणी बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना केली होती. दरम्यान एकंदरीतच परिस्थिती पाहता. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. त्याचबरोबर पंतप्रधान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही आपल्याला राज्यात एक हाती सत्ता मिळेल अशा प्रकारचा विश्वास होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जादू पुन्हा एकदा चालली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश महाराष्ट्रात मिळालेले नाही. दरम्यान शिवसेना मुख्यमंत्री पदाकरता अडून राहिली. आणि असे काही ठरलेच नव्हते हा मुद्दा भाजपकडून रेटला गेला . त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय पेच वाढत गेला. त्यातच अजित पवार यांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रामप्रहरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान शरद पवार यांच्यासह पूर्ण पक्षाने भाजप बरोबर न जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि काही तासातच फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना होऊन उद्धव ठाकरे यांची नेता म्हणून निवड करण्यात आली.28 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. आणि बाळासाहेब थोरातांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले.

विखे गेल्याने जिल्ह्यात चांगले दिवस येतील
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हातात घेतले. विखे यांच्यासह इतर मंडळी गेली. त्यामुळे जागा मोकळा झाल्या तिथे नवीन नेतृत्वाला संधी येता येईल. ते गेल्यामुळे आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील चांगले दिवस येतील. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधताना नोंदवली होती. विधानसभा निवडणुकीचा निकालात दोन्ही काँग्रेसला या जिल्ह्यात समाधानकारक यश मिळाले. भाजपाला विखे यांच्यासह फक्त तीनच आमदार निवडून आणता आले. यावरून बाळासाहेबांनी वर्तवलेले हा अंदाजही खरा ठरला.