बिमा नाक्यावर शिवसेनाचा जयघोष

 

सत्ता स्थापनेचा महानगर  प्रमुखांसह शिवसैनिकांचा जल्लोष
पनवेल /प्रतिनिधी: – गुरुवारी सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राला पहिल्यांदा प्रत्यक्ष ठाकरे सरकार मिळाले. याचा आनंद शुक्रवारी सकाळी कळंबोली येथील बीमा नाक्यावर साजरा करण्यात आला. याठिकाणी शिवसेना… शिवसेना या गीतावर महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला
महाराष्ट्रात तब्बल वीस वर्षाने शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर गुरुवारी अलोट गर्दी जमली होती. या शपथविधीला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार तसेच कोळी बांधवांनी हजेरी लावीत हा कार्यक्रम सर्वसमावेशक केला. दरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने संपूर्ण राज्यात शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याला पनवेल ही अपवाद ठरले नाही. शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी बिमा संकुलाच्या समोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याचबरोबर एकमेकांना पेढा भरून तोंड गोड करण्यात आले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्याचबरोबर शिवसेनेच्या टायटल सॉंग वर या सर्वांनी ठेका धरला. यावेळी महानगर प्रमुखांसह महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष गोविंद साबळे, विलास कदम, बालाजी खोडेवाल, रवींद्र कडव, निलेश भगत, चंद्रकांत कदम , हनुमंत पिसाळ उपस्थित होते.