उद्धव ठाकरेंवरील  विश्वास निलेश लंकेंनी जिंकला

 

 

 


मॅजिक फिगर गाठणारा 145 नंबर मोजला
सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून केले स्वागत
नाना करंजुले
मुंबई/ प्रतिनिधी: – महाराष्ट्र विकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आपले बहुमत सिद्ध केले. 145 हा मॅजिक फिगर चा नंबर पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांनी मोजत ठाकरे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव एक प्रकारे
जिंकला. लकी ठरलेल्या लंके यांनी एक प्रकारे विधानसभेचे सभागृह जिंकले. त्याबद्दल त्यांचे सर्वांनीच अभिनंदन करून कौतुक केले.
पारनेर नगर या दुष्काळी विधानसभा मतदारसंघातून आमदार निलेश लंके निवडून आले आहेत. पूर्वाश्रमीचे हाडाचे शिवसैनिक आणि माजी तालुकाप्रमुख म्हणून त्यांची आजही ओळख पुसलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सामान्य युवकाला उमेदवारी दिली आणि जनतेने निवडणूक आपल्या हातात घेत लंके यांना आमदार केले. तसेच सलग तीन टर्म आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या विजयराव औटी यांचा त्यांनी पराभव केला. दरम्यान पारनेर आणि नगर मध्ये शिवसेना वाढवण्याकरीता दीड दशकांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या लंके यांची दोन वर्षांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. परंतु जनसामान्यात पोहोचलेले हे नेतृत्व ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेषता शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी दिली. इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे आपल्यालाही वाटले नव्हते अशा शब्दात पवार यांनी त्यांचे कौतुक केले. विक्रमादित्य, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले दुसरे आर .आर .आबा अशी ही उपाधी त्यांना मोठ्या पवारांनी दिली. शपथविधीच्या अगोदर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना भेटण्याकरीता हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी हाच तो निलेश लंके अशा शब्दात ओळख करून दिली होती. तू सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे तुला ओळखण्यात आम्हाला उशीर झाला असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढीत लंके यांच्या पाठीवर थाप दिली होती. दरम्यान शुक्रवारी पारनेर नगरच्या या युवा आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शुभेच्छा देऊन अभिनंदनही केले होते. शनिवारी विधानसभेत विकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. याठिकाणी हेड टू हेड अशी मोजणी करण्यात आली. योगायोगाने145 हा क्रमांक आमदार निलेश लंके यांनी मोजला आणि ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान लंके यांनी मॅजिक फिगर चा आकडा हात वर करुन उच्चारताच सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केले लकी लंके यांचे अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे या गॅलरीत बसून विश्वासदर्शक ठरावाच्या घडामोडी पाहत होत्या. सभागृहाचे काम संपल्यानंतर खासदार सुळे यांनी लंके यांची भेट घेत अभिनंदन केले. तसेच विजयाचे खुन करीत आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून आमदार निलेश लंके यांचा सोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी मोजलेल्या मॅजिक फिगरच्या आकडाचाही त्यामध्ये उल्लेख केला आहे.