पोदीवरील रखडलेला रस्ता झाला टकाटक

 

 

 

विसपुते महिला वस्तीगृह ते हनुमान मंदीरपर्यंतचा मार्ग

प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे यांचा पाठपुरावा

पनवेल/प्रतिनिधी- नवीन पनवेल आणि पनवेलला जोडणारा पोदी क्रमांक १ येथील रस्त्यांचे काम रखडले होते. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे यांनी अखंडीतपणे पाठपुरावा करून  नगरोत्थान योजनेच्या निधीतून हे प्रलंबीत काम पूर्ण केले आहे. त्यामुळे विसपुते महिला वस्तीगृह ते पोदी क्रमांक -१ येथील हनुमान मंदीरपर्यंतचा मार्ग टकाटक झाला आहे. त्यामुळे पनवेलकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवीन पनवेल आणि पनवेलला एचडीएफसी सर्कल येथून जावे लागते. नवीन पनवेलच्या अनेक सेक्टरमधील रहिवाशांना वळसा घालून जावे लागते. त्याला पर्याय म्हणून पोदी क्रमांक-१ येथून जुना  रस्ता आहे. विसपुते महिला वस्तीगृहापासून तो जातो. हा रोड पनवेल रेल्वेस्थानकाच्या समोरून थेट पनवेल शहरात जातो. यावर मोठया प्रमाणात रहदारी असते. पिल्लाई महाविदयालय परिसर आणि विचुंबे येथील रहिवाशांना पनवेलला जाण्या येण्यासाठी  हा मार्ग जवळचा आहे. परंतु त्याची दुरावस्था झाली होती, ठिकठिकाणी खड्डे पडले होते. तसेच काही जागेवर खड्डी वर आली होती. यामुळे  वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. दरम्यान स्थानिक नगरसेवक म्हणून प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे यांनी सिडको आणि महापालिकेकडे पाठपुरावा केला. तांत्रिक अडचणीत रस्त्याचे काम अडकल्याने  कांडपिळे यांनी याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे घातले. त्यानंतर नगरोत्थान योजनेतून या रस्त्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. बुधवारी हे काम पूर्ण झाल्याने  पनवेल आणि नवीन पनवेलकर  त्याचबरोबर प्रभाग क्रमांक वीसमधील स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

“पोदी क्रमांक-१ येथील या रस्त्यावर वाहनांची सातत्याने ये जा सुरू असते.  पनवेल आणि नवीन पनवेलला जोडणारा हा जवळचा आणि जुना मार्ग आहे. काही तांत्रिक गोष्टीमुळे रस्त्याचे काम रखडले होते. याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सततचा पाठपुरावा केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार नरोत्थान निधीतुन रस्ता चकाचक केला आहे.”

तेजस कांडपिळे

प्रभाग समिती सभापती

पनवेल महापालिका