नवीन पनवेल सिडको कार्यालयावर ट्रॅप

 

 

 


सहाय्यक वसाहत अधिकारी पन्नास हजाराच्या लाचेत अडकला
नवी मुंबई अॅन्टी करप्शनचा ब्युरोची कारवाई
पनवेल/प्रतिनिधी:- घर ट्रान्सफर करण्यासाठी एजंट मार्फत 50 हजारांची लाच स्वीकारताना सिडकोच्या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केले. त्यामुळे सिडकोतील वसाहत विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली.

सागर मदनलालजी तापडीया , वय ४७ वर्ष असे या सहाय्यक वसाहत अधिकार्‍याचे नाव आहे. त्याच्याकडे नवीन पनवेल नोडची जबाबदारी होती. तक्रारदाराला त्याची रूम ट्रान्सफर करण्याकरीता तापडिया याने पन्नास हजार रुपयांची लाच 1 नोव्हेंबर रोजी मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे याविषयी तक्रार केली. त्याप्रमाणे सोमवारी नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयात सापळा रचण्यात आला. या कामाकरता वसात अधिकाऱ्याने खाजगी एजंट रविंद्र हुकमीचंद छाजेड वय ( ५४ ) याच्यामार्फत 50 हजार रुपयाची लाच स्वीकारली. तापडिया याने छाजेड याला लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला . पोलीस अधीक्षक महेश पाटील , पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रमेश चव्हाण , पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे व पोलीस कर्मचारी यांनी हा सापळा रचला .
भ्रष्टाचाराचे कुरण
सिडको चा वसाहत विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. याठिकाणी सर्वसामान्यांची कामे केली जात नाहीत. त्याकरीता सर्रास लाचेची मागणी केली जाते. विशेष म्हणजे या कार्यालयात एजंट शिवाय काम होत नसल्याचे सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवर स्पष्ट झाले आहे.

वसाहत विभागात खाजगी कर्मचाऱ्यांचा वावर
सिडकोच्या वसाहत विभागाच्या नोडल कार्यालयामध्ये खाजगी कर्मचारी नेमले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात. त्यांना सहाय्यक वसाहत अधिकारी पैसे देतात. त्याचबरोबर अतिशय महत्वाचे कागदपत्र हे खाजगी कर्मचारी हाताळून कसे शकतात असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भातही पडताळणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.