प्राचार्य इक्बाल इनामदारांच्या सेवापुर्तीचा हृदयस्पर्शी गौरव

 

छाया-(हिरामन बेलोटे)

58 दिव्यांनी ओवाळणी.नाण्यांचा आणि चॉकलेटचा घातला हार
पनवेल/प्रतिनिधी कळंबोली येथील सुधागड हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य इक्बाल अजीजभाई इनामदार प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्याबद्दल शिक्षिकांनी त्यांची58 दिव्यांनी औक्षण केले. त्याचबरोबर तितक्याच चॉकलेट आणि नाण्यांचा हार घालत शाळेने त्यांचा हृदयस्पर्शी सेवापूर्ती गौरव सोहळा केला. इनामदार सरांबद्दल मनोगत व्यक्त करीत असताना सहकारी शिक्षकांना गहिवरून आले.

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र लिमये, लेखक साहित्यिक संतोष खेडलेकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दिपक निकम, नगरसेवक विजय खानावकर, नगरसेविका मोनिका महानवर, ऍड श्रीनिवास क्षिरसागर, संस्थेचे सचिव रविकांत घोसाळकर यांच्यासह शिक्षक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच इक्बाल इनामदार यांचे कुटुंब स्नेही उपस्थित होते. इनामदार यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटी मध्ये तीन दशकांपेक्षा जास्त काळ काम केले . सहाय्यक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. त्यांनी ज्ञानदानाचे उत्तम कार्य केले. संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी इक्बाल इनामदार यांच्यावर सावळे विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी दिली. त्यानंतर कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या प्राचार्यपदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी या पदाला न्याय देत शाळेचा कायापालट केला. उत्तम मुख्याध्यापक प्रशासक आणि मुले रुपी गोळ्यांना घडवणारे गुरु म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षक म्हणून इनामदार यांनी अनेक वर्षे केले. शालेय मुला-मुलींना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे त्यांनी आपले कर्तव्य समजले. आणि त्याच भावनेतून ज्ञानाचे सिंचन ते करीत राहिले. 10 हजार विद्यार्थी कळंबोली सुधागड शैक्षणिक संकुलात ज्ञानाचे धडे गिरवीत आहेत. यशाची शिखरे पादाक्रांत करणारे अनेक जण या शाळेचे आणि प्राचार्य इक्बाल इनामदार यांचे विद्यार्थी आहेत. मागील वर्षी माजी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी भव्य दिव्य असा मेळावा भरवण्यात आला होता. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या भावनेतून दादासाहेब लिमये यांनी कळंबोली येथे सुधागड हायस्कूल सुरू केले. त्याच शिकवणीतून इक्बाल इनामदार त्यांनी काम केले. याठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना सक्षम करण्याकरता परिश्रम साडेतीनशे पेक्षा जास्त शिक्षक घेत आहेत. अत्याधुनिक शिक्षण प्रणालीचा वापर करत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत येथील विद्यार्थी टिकला पाहिजे या भावनेतून इक्बाल इनामदार यांनी संकुलाचे प्रमुख म्हणून अनेक बदल केले. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. यादरम्यान अनेक कठीण आणि कसोटीचे प्रसंग आले. त्यातून वाट काढत इनामदार यांनी सर्वांनाच एक प्रकारे धैर्याची शिकवण दिली . त्यांच्या सेवेचा शनिवारी गौरव करण्यात आला. उपस्थितांनी प्राचार्य इक्बाल इनामदार यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलूंना उजाळा दिला. वसंत ओसवाल, रविंद्र लिमये यांच्यासह उपस्थितांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करीत प्राचार्य इनामदार यांच्या कार्याचा गौरव केला. गौरव मूर्तींनी ही सर्वांचे आभार व्यक्त केले.