आमदार निलेश लंके यांचे  पारनेरबरोबरच पनवेल राष्ट्रवादीला बळ

 

 


पनवेल शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस कमिटीमध्ये उत्साह
भविष्यात पक्षाला राजकीयदृष्ट्या फायदा होणार
पनवेल/प्रतिनिधी- आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर नगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यामुळे तब्बल दीड दशकानंतर परिवर्तन झाले. त्यामुळे पक्षांमध्ये नवा संचार पसरला. याशिवाय मुंबईच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पनवेल स्थित पारनेरकर राहतात. त्यांच्यामध्ये आ. लंके यांचा प्रभाव असल्याचे 5 जानेवारी रोजी झालेल्या मेळाव्यावरून दिसून आले. त्यामुळे पनवेल परिसरात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक प्रकारे बळ मिळाले आहे. त्याचा फायदा आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये नक्कीच होईल असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भौगोलिकदृष्टया विस्ताराने राज्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून पारनेरची ओळख आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील अनेक कुटुंब नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत आले आहेत. मासळी निर्यात, ट्रान्स्पोर्ट, व्यापारात  पारनेकर मोठया संख्येने आहेत. यापैकी बहुतांशी जणांनी कामोठे वसाहतीत घरे घेतली आहेत. आजचा विचार केला तर या नोडमध्ये साडे तीन हजार घरे या तालुकावाशीयांची आहेत.त्याचबरोबर कळंबोली,नवीन पनवेल.खांदा  वसाहत  आणि खारघर, नावडे येथे  पारनेरकर राहतात.येथे राहणाऱ्या प्रत्येकांचा आपल्या मुळ गावी तसेच  तालुक्यात संपर्क आहे. कामोठे येथे राहून अनेकजण आपल्या गावात राजकारण करीत आहेत. एकंदरीत  पनवेलस्थित पारनेरकरांची भूमिका  पारनेरबरोबर पनवेलच्या राजकारणात सुध्दा अतिशय महत्वाची मानली जाते. मात्र यापैकी बहुतांशी  पनवेलस्थित पारनेरकरांवर निलेश लंके यांचा प्रभाव आहे. कामोठे वसाहती लंके यांची  सतत उठबस असते. छोटया मोठया कार्यक्रमांना ते थेट पारनेर येवून हजेरी लावतात. निलेश लंके प्रतिष्ठानने गेल्यावर्षी   ६ जानेवारी रोजी मुंबईस्थित पारनेकरांचा भव्य मेळावा कामोठे वसाहतीतच घेतला होता. या ठिकाणी जमलेली गर्दी पाहता पनवेलच्या राजकारण सुध्दा चकीत आणि थकीत झाले. निलेश लंके यांच्याबद्दल पनवेलच्या राजकिय मंडळीमध्ये  कमालीचे कुतुहल निर्माण झालेले आहे. त्यातच त्यांनी या ठिकाणाहून आपल्या जहाजाला राष्ट्रवादीचा झेंडा लावण्याचा निर्णय घेतला. तसेच कामोठे येथील मेळाव्यातून विधानसभेचे रणसिंग फुंकले. इतकेच नाही तर त्यांनी पारनेर – नगर चे मैदान जिंकून इतिहास घडवला.365 दिवस 24 तास लोकांमध्ये राहणारे लोकवर्गणीतून निवडून आलेले आमदार अशी लंके यांची ओळख आहे. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. कळंबोलीत ज्याप्रमाणे माथाडी वर्गावर शशिकांत शिंदे आणि गुलाबराव जगताप यांचा प्रभाव आहे. त्यांचा फायदा पक्षाला विविध निवडणुकांमध्ये झालेला  आहे. त्याचप्रमाणे निलेश लंके यांच्यामुळे कामोठेसह इतर वसाहतीत राष्ट्रवादी पक्षाला ताकत मिळाली आहे , असे राजकिय विश्लेषकांचे म्हणणे आहे. पाच जानेवारी रोजी कामोठे येथे निलेश लंके प्रतिष्ठान चा पहिला वर्धापन दिन झाला. यावेळी आ. लंके यांचा नागरी सत्कार सुद्धा करण्यात आला. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या मेळाव्याचे राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा झाली.
पनवेलमध्ये मोठया संख्येने असलेल्या पारनेकरांना लंकेच्या रूपाने चांगले नेतृत्व मिळाले. या ठिकाणी पक्षसंघटना वाढीसाठी नक्कीच मदत होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा सरचिटणीस भाऊ पावडे यांनी व्यक्त केला.

मुंबई, ठाणे, भिवंडी बोईसर परिसरात निलेश लंके यांची ताकद
पनवेल बरोबरच पारनेर नगरकर मुंबई, ठाणे, भिवंडी, बोईसर, कल्याण , नवी मुंबई या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात राहतात. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील इतर तालुके तसेच पुण्यातील जुन्नर आंबेगाव येथील मूळ रहिवासी असलेले पण मुंबईत स्थायिक झालेले अनेक जण आ.लंके यांना मानतात. त्यामुळे या सर्व ठिकाणी त्यांची ताकद मानली जाते. त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाला नक्की होऊ शकतो. असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे

“रायगड जिल्ह्यात तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. सुदैवाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. आदिती तटकरे या जिल्ह्याच्या पालक मंत्री झाल्या आहेत. त्यातच कामोठे आणि इतर परिसरात मूळ घाटमाथ्यावरील मंडळींमध्ये आमदार निलेश लंके यांचा प्रभाव आहे. त्यांच्या रूपाने आम्हाला चांगले नेतृत्व मिळाले आहे. आगामी काळात पक्षवाढी करीता आ. लंके यांची नक्कीच मदत होईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये संदेह नाही.”
सतीश पाटील
पनवेल जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष