पनवेल महापालिका पोटनिवडणुक भाजपने जिंकली

 

 


रुचिता लोंढे यांचा 3844 मतांनी विजय
महाविकास आघाडीला अपयश
पनवेल /प्रतिनिधी: – पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 19 मधील पोटनिवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी तब्बल 3844 मतांनी शिवसेनेच्या स्वप्नील कुरघोडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत महा विकास आघाडीला अपयश आले.
मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनानंतर प्रभाग 19 मधील जागा रिक्त झाली होती. याठिकाणी त्यांच्या कन्या रुचिता यांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले. तर शिवसेनेच्या स्वप्ना लक्ष्मण कुरघोडे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही बाजूकडून प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांचे होम ग्राउंड होते. त्यामुळे ठाकूर बंधूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीनेही याठिकाणी जोर लावला होता. गुरुवारी यासाठी मतदान झाले. परंतु मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह जाणवत होता. शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. लोंढे यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. त्यांना सहा हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. तर स्वप्नील कुरघोडे यांना 2387 इतकी मते मिळाली. गुरुवारी यासाठी फक्त 31 टक्के मतदान झाले होते. म्हणजे 8700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागात एकूण 28 हजारांपेक्षा जास्त मतदान आहे. 1 78 जणांनी नोटाला मतदान केले. दरम्यान या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांचे तोंड गोड करण्यात आले. या निकालाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे.