पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

उपमुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचे जिल्हाध्यक्षांचे आश्वासन
महापौर डॉ. कविता चौतमोल यांनाही दिले निवेदन
पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल महानगरपालिकेत काम करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना तीन वर्षांनंतरही आस्थापनेवर वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे भविष्य अधांतरीच दिसत आहे. याविरोधात मुन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी पाठिंबा दिला. पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील आणि कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे घालणार असल्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली. महापौर डॉ कविता चौतमोल यांनाही निवेदन देण्यात आले.
 पनवेल महानगरपालिकेची स्थापना १ ऑक्टोंबर २०१६ रोजी झाली . महानगरपालिकेमध्ये पूर्वाश्रमीच्या २९ ग्रामपंचायतीमधील सुमारे ३८४ कर्मचारी आजतागायत कार्यरत आहेत . तरीसुद्धा अदयापपर्यंत सदर कर्मचा – यांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वर्ग करुन घेण्यात आले नाहीत. अर्थातच त्यांचा महानगरपालिका प्रशासनामध्ये समावेश झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट  ओढावले  आहे . कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक गरजेशी निगडीत सर्व  अडचणींना सामोरे जावे लागत आहे . पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यत याबाबत कोणत्याही ठोस हालचाली झाल्याचे दिसून आल्या नाहीत . त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी दुसरा पर्याय नसल्याने   आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलन उभे केले आहे . पनवेल महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला  मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट दिली. त्यांनी कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा केली. या सर्व कामगारांना महापालिकेचे सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू अशी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.