रायगड जिल्ह्यात भाजपाचे संघटनात्मक विकेंद्रीकरण

 

 


उत्तर आणि दक्षिण करिता दोन अध्यक्ष
आमदार प्रशांत ठाकूर आणि ॲड महेश मोहिते यांच्यावर जबाबदारी
पनवेल /प्रतिनिधी: – भारतीय जनता पक्षाने रायगड जिल्ह्यात पदांचे संघटनात्मक विकेंद्रीकरण केले आहे. त्यानुसार उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी अनुक्रमे आमदार प्रशांत ठाकूर आणि ॲड महेश मोहिते यांच्यावर देण्यात आली आहे. मंगळवारी ही निवड करण्यात आली. आगामी काळात पक्षवाढीसाठी याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या पाच वर्षात रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. आज जिल्ह्यात अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांच्यासह तीन आमदार आहेत. एकंदरीतच पक्ष विधानसभा निवडणुकीत क्रमांक एक वर आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी 2014 ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे पनवेल आणि उरण मध्ये कमळाची ताकद वाढली. पुढे त्यांच्यावर रायगड जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या पंचवार्षिकचा विचार करीत असताना आ. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कमळ विस्तारलेले आहे. मध्यंतरीच्या काळात कर्जत चे माजी आमदार देवेंद्र साटम भाजपामध्ये आले. त्याचबरोबर वसंत भोईर यांच्यासह अनेकांनी कमळ हातात घेतले. सहाजिकच कर्जत खालापूर मध्येही पक्षाची ताकद वाढली. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पेण मध्येही माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतला. विशेष म्हणजे रवीशेठ पाटील दोन पराभवानंतर पुन्हा विधानसभेत गेले. कमळाचे चिन्ह त्यांना लकी ठरले. याव्यतिरिक्त अलिबाग, श्रीवर्धन, महाड, या पट्ट्यात सुद्धा भाजपाचा प्रभाव पूर्वीच्या तुलनेत वाढलेला आहे. अर्थात जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांना याचे बऱ्याच अंशी श्रेय जाते. त्याचबरोबर माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही मोलाचा वाटा होता. दरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड हा मोठा जिल्हा आहे. त्यातच नवनवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्प येऊ घातले आहेत. औद्योगीकरण आणि नागरीकरण वाढत चालले आहे. त्यातच राजकीय समीकरण बदलत चालले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक दृष्ट्या रायगडचे दोन भाग केले आहेत. उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचे निवड करण्यात आली आहे. तर दक्षिण रायगडची जबाबदारी ॲड महेश मोहिते यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यामुळे पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून अधिक वेळ देता येईल. तसेच संघटनात्मक वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करणे सोपे होणार आहे असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे. मंगळवारी पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आ. ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे नेते माजी आमदार विनय नातू, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, वाय . टी देशमुख बाळासाहेब पाटील, श्रद्धा पटवर्धन, विक्रांत पाटील, अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्हाध्यक्षांचे सर्वांनीच अभिनंदन करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.