विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारली पतंगाकृती

कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूल मधील अनोखी मकरसंक्रात
पनवेल /प्रतिनिधी: – मकर संक्रांत म्हटले की पतंग आलेच. आकाशात पतंग उडवून मनसोक्त आनंद आजही घेतला जातो. पतंगा शिवाय मकर संक्रातीला मजा ती काय येणार. आजही लहानापासून मोठ्यांपर्यंत रंगबेरंगी पतंगाची क्रेज आहे. ही परंपरा आणि संस्कृती आहे. याच पार्श्वभूमीवर कळंबोली येथील शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम रित्या पतंगाची कलाकृती साकारण्यात आली होती. हिरवा, निळा, लाल आणि पिवळ्या रंगाचे टी-शर्ट घालून आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा पतंग साकारला. या स्तुत्य व हेवा वाटणाऱ्या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि कळंबोलीतील नागरिकांनी कौतुक केले.
शाळेच्या व्हरांड्यात ही कलाकृती साकारण्यात आली होती. पतंगाच्या आकाराच्या आखीव आणि रेखीव पद्धतीने विद्यार्थ्यांच्या रांगा आखण्यात आल्या होत्या. यासाठी अगोदरच रंगीत तालीम घेण्यात आली होती. दरम्यान मकर संक्रांत या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, पतंग संस्कृतीचे दर्शन घडावे या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर, डोळे दिपवणारी अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती. शालेय मुला-मुलींनी ही अतिशय उत्तम प्रतिसाद देत  हा उपक्रम यशस्वी केला. संस्थेचे अध्यक्ष सतीश मोहन पाटील, उमेश पाटील, 
सनी पाटील, तुषार पाटील यांच्यासह मुख्याध्यापक यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या उत्तम कलाकृतीला उस्फूर्तपणे  भरभरून दाद दिली. या पतंगाच्या प्रतिकृतीची छाया आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. सतीश पाटील यांनी यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचे कौतुक केले. आणि मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.