अभिनेत्री शबाना आजमी यांच्या कारला अपघात

 


खालापूर टोल नाक्याजवळील घटना
खालापुर  /प्रतिनिधी: ज्येष्ठ हिंदी सिने अभिनेत्री शबाना आजमी यांच्या कारला शनिवारी दुपारी अपघात झाला. त्यामध्ये त्या जखमी झाल्या असून त्यांना कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर त्यांचे पती लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर हेसुद्धा त्या कारमध्ये होते असे समजते. परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
जावेद अख्तर यांच्या बर्थडे पार्टीच्या पार्श्वभूमीवर पुण्याकडे चालल्या असल्याची  माहिती मिळते . त्यावेळी खालापूर टोल नाक्याजवळ शबाना आजमी यांच्या एम एच 2 सी झेड 5 385 या क्रमांकाच्या कारने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली असल्याचे समजते. त्यामध्ये आजमी या जखमी झाल्या. महामार्ग पोलीस आणि शीघ्र कृती दलाने त्यांना उपचारार्थ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने सिने जगतातील अनेकांनी जावेद अख्तर यांना फोन करून विचारपूस केली. खालापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.