247 कोटी 56 लाख रुपयांचा जिल्हा विकास आराखडा

 

 

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न 
राज्य शासनाकडून आणखी निधी मंजूर करून घेणार
अलिबाग/ प्रतिनिधी: – रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी 189.64 कोटी, टी.एस.पी. 32.98 कोटी, एस.सी.पी. 24.94 कोटी अशा एकूण 247 कोटी 56 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. विकास आराखड्याचे नियोजन करतांना जिल्ह्यात राबवावयाच्या विकास कामांसाठी राज्य व केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी उपस्थित सदस्यांना दिली.
नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार श्रीरंग बारणे, खा.सुनिल तटकरे, आ. भरत गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, आ.रविशेठ पाटील, कोकण विभागीय अधिकारी शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
पालकमंत्री तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण व विकास कामांचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढीव निधी साठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तालुका स्तरीय क्रीडा संकुल अद्ययावत करण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे. अंगणवाडी दुरुस्तीसाठी शासन निर्णयानुसार 1 लक्ष मर्यादा आहे. सदर मर्यादा वाढविण्यासाठी शासन स्तरावर शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोकण विभागात मंजूर निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा आघाडीवर आहे. त्यादृष्टिने फेब्रुवारी महिनाअखेर निधी 100 टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही यंत्रणा प्रमुखांना देण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी अभिनंदन ठराव व दु:खवट्याच्या मंजूर ठरावाचे वाचन करुन श्रदांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, आ. भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, आ.रविशेठ पाटील,आदींनी सहभाग घेतला.

जिल्ह्यात महत्वपूर्ण योजना राबवणार

रायगडात महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा संकल्प पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला. त्यानुसार
जिल्ह्यातील सर्व स्मशानभूमी बांधकामासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच विविध योजनेसाठी वाढीव मागणी 45 कोटी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरीय सभेत मा.वित्तमंत्री महोदयांकडे मागणी करण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण योजनांतर्गत पुढीलवर्षी रुग्णांसाठी स्पीडबोट तयार करण्याची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

विद्यार्थिनींना मोफत सायकली पुरवल्या जाणार
इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थीनींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेतील उपस्थिती वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुलींना सायकल पुरविणे हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये शाळा ते घर हे अंतर 5 कि.मी. पेक्षा जास्त असल्यास अशा मुलींना प्राधान्याने सायकल देण्यात येणार आहे.

गावात घनकचरा व्यवस्थापनावर भर
नागरी सुविधा अंतर्गत 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये 20 कि.मी. परिसरातील गावांचाही कचरा उचलून निचरा करण्याची योजना आहे.