विद्यार्थी वाहकांना सुरक्षितता आणि कायद्याचे धडे

 


तज्ञांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रबोधन
विद्यार्थी वाहक संस्थेचा अनोखा उपक्रम
पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांची घरापासून शाळा आणि शाळेपासून घर अशी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांची कार्यशाळा रविवारी पार पडली. विद्यार्थी वाहक संस्था आणि पनवेल आरटीओ यांच्या विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 2020 या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थित विद्यार्थी वाहकांना सुरक्षितता आणि कायद्याविषयी मार्गदर्शन करून प्रबोधन केले. तसेच विद्यार्थ्यांचा सुरक्षितते बरोबरच त्यांची मानसिकता आणि सवयींकडे लक्ष देण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
गोखले सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ गिरीश गुणे, परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, सामाजिक कार्यकर्ते हरेश बेकावडे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,कायदेतज्ञ डॉ शुभांगी झेमसे, ज्योती देशमाने, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन भूमकर, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका रुचिता लोंढे, विद्यार्थी वाहक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे, कार्यक्रम कमिटीचे अध्यक्ष किसन रौंधळ, मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह पदाधिकारी , विद्यार्थी वाहक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोखले सभागृह मध्ये पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये डॉ गिरीश गुणे यांनी अतिशय मार्मिक आणि उद्बोधक मार्गदर्शन केले. पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेमध्ये साडेचारशे सभासद आहेत. आणि ते पंधरा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. किमान एक ते दीड तास विद्यार्थी स्कूल व्हॅन काकांबरोबर राहतो. इतका वेळ काही विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांना सुद्धा देता येत नाही. स्कूल व्हॅन चालकां बरोबर विद्यार्थ्यांची भावनिक ,मानसिक नाते जोडले जाते. ते मानसिक दृष्ट्या त्यांच्याजवळ येतात. स्कूल व्हॅन काकांचे अनेकदा ते अनुकरण करतात. त्यामुळे विद्यार्थी वाहकांची मानसिकता कशी आहे. त्यावर त्या व्हॅन मधून प्रवास करणारे विद्यार्थी उद्याचे नागरिक होण अवलंबून असते. विद्यार्थी व हक्कांचे विचार, वर्तणूक शुद्ध आणि प्रामाणिक असेल. तर विद्यार्थीही त्याच पद्धतीने अनुकरण करतात. त्यामुळे स्कूल व्हॅन चालकांची भविष्यात सक्षम पिढी घडवण्यासाठीची भूमिका अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत डॉ गिरीश गुणे यांनी व्यक्त केले. अॅड शुभांगी झेमसे यांनी विद्यार्थी हे फार संवेदनशील असल्याचे सांगितले. त्यामुळे या वयातच ते चुकीच्या मार्गाला ही जाऊ शकतात. अनेकदा अमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या व्हॅन मधील मुलगा काही वेगळा वागत असेल तर त्याबाबत पालक किंवा शिक्षकांना माहिती द्या असे आवाहन अॅड झेमसे यांनी विद्यार्थी वाहकांना केले. मुलं ही निरागस असतात आणि ते अनुकरण करीत असतात. म्हणून स्कुल व्हॅन चालकांनी धूम्रपान तसेच इतर व्यसन त्यांच्यासमोर करू नये असेही त्यांनी सांगितले. प्रीतम म्हात्रे यांनीही विद्यार्थी वाहक संस्थेचे सभासद आपल्या दैनंदिन कामाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवतात. त्यांचे काम खऱ्या अर्थाने आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सर्वांना केले. हरेश बेकावडे यांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांचे प्रश्न मांडले. त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत भाष्य केले. पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या चे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी वाहतूक, सुरक्षितता, तसेच संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम याविषयी माहिती दिली.

परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांचे मौलिक मार्गदर्शन
विद्यार्थी वाहक अतिशय चांगले काम करीत आहेत. त्यांच्या हातात पालक आपलं भविष्य सोपवतात. म्हणजे एक प्रकारे सोन ते तुमच्याकडे देतात. ते सुखरूप सुरक्षित पोहोचवण्याचे काम विद्यार्थी वाहक करीत असतातच . परंतु यापेक्षा अधिक सुरक्षितता घेणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळाव्यात असे आवाहन परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी केले. शासनाला कायदे करावे लागतात हीच गोष्ट आपल्यासाठी दुर्दैवाचे असल्याचे ते म्हणाले. कारण काही वाहन चालक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे शासनाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

नेत्र, आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी वाहक संस्थेच्यावतीने रविवारी नेत्रचिकित्सा, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.110 पेक्षा जास्त जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच लक्ष्मी आय इंस्टिट्यूटच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली. याशिवाय चष्मे वाटपही करण्यात आले. कच्छ युवक संघ तसेच ज्योती फाउंडेशनच्या सहकार्याने हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.

ज्योती फाउंडेशनच्या वतीने प्रथम उपचार पेटयांचे वाटप
ज्योती फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थी वाहकांना प्रथम उपचार पेटींचे वाटप करण्यात आले. या पेटया स्कूल व्हॅन मध्ये बसवण्यात येणार आहेत. यासाठी ज्योती देशमाने यांनी पुढाकार घेतला. डॉ गिरीश गुणे, प्रितम म्हात्रे,हरेश बेकावडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पेटया देण्यात आल्या.