सहा लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर जन ‘आरोग्या’चे उपचार

 


महाराष्ट्रातील अनेकांचे’आयुष्यमान’ही वाढले
 गोरगरीब व गरजू रुग्णांवर तेराशे कोटी रुपयांचा खर्च
नाना करंजुले
मुंबई /प्रतिनिधी: – महाराष्ट्रातील गोरगरीब गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजना वरदान ठरलेले आहे. आयुष्यमान भारत ही केंद्र शासनाची योजना सुद्धा राज्यात प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. या दोन्ही योजनेचा सहा लाख एक हजार रुग्णांनी गेल्या वर्षभरात लाभ घेतला आहे. यावर तेराशे कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यामुळे आयुष्य वाढण्यास मदत झालीच. त्याचबरोबर उपचारासाठी कर्ज, मालमत्ता विक्री चे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला आहे.
वैद्यकशास्त्र अतिशय पुढे गेल्याने मृत्यूंचे प्रमाण घटले आहे. ही गोष्ट खरी असली तरी अनेक दुर्धर व दुर्दम्य आजारांवरील उपचार खर्चिक आहेत. सर्वसामान्य गरीब आणि गरजूंच्या खिशाला खाजगी रुग्णालयात हे उपचार न परवडणारे आहेत. अनेकदा शासकीय दवाखान्यात अत्याधुनिक दर्जाचे उपकरणे नसतात. तसेच सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो. परिणामी रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळत नाहीत. त्या अभावी रुग्ण दगावले जातात. या पार्श्वभूमीवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचार मिळावेत या उद्देशाने राजीव गांधी जीवनदायी योजना अंमलात आणली . या माध्यमातून गरीब आणि गरजूंना उपचार देण्यात आले. पुढे 2016साली या योजनेला महात्मा फुले जन आरोग्य योजना चे नाव देण्यात आले. त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना सहज आणि सोपस्कर रित्या उपचार कसे मिळतील यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच यामध्ये आजारांची संख्या ही वाढवण्यात आली. दीड वर्षापूर्वी याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ .सुधाकर शिंदे यांची तत्कालीन शासनाने नियुक्ती केली. कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शिंदे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये कमालीची पारदर्शकता आणली. पॅनल वरील हॉस्पिटलांवर नियंत्रण आणले. या योजनेत उपचार घेणाऱ्या कोणत्याही रुग्णाकडून एकही रुपया घेतला जाऊ नये म्हणून त्यांनी कटाक्षाने लक्ष घातले. परिणामी गेल्या दीड पावणेदोन वर्षांत जन आरोग्य योजना खऱ्या अर्थाने लोकाभिमुख बनली आहे. या ठिकाणी क्लाऊड सिस्टीम वापरण्यात आली. त्यामुळे सुसूत्रता आणि पारदर्शकता आली. तसेच एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होऊ लागली आहेच. तसेच संपूर्ण कारभार कॅश आणि पेपरलेस झाला आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप कुमार व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य योजनेची टीम राज्यात अतिशय चांगले काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयुष्यमान भारत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
2018 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना लॉन्च केली. या माध्यमातून तळागळातील, गरीब गरजूंना वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. आरोग्यावर विशेष भर देणारी आयुष्यमान भारत योजना राज्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या कामाची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. महाराष्ट्रात ही योजना कशा पद्धतीने यशस्वीपणे राबवली जात आहे. तसेच रुग्णांना थेट उपचार देण्याची पद्धत त्याचबरोबर यंत्रणा या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी बाहेरील राज्यातील अनेक शिष्टमंडळ मुंबईत येत आहेत. पंतप्रधानांनीही महाराष्ट्रात आयुष्यमान भारत योजना प्रभावीपणे राबवली जात असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे.

उपचारासाठी दोन हजार कोटी 
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून यापुढेही जास्तीत जास्त रुग्णांना उपचार मिळावेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. हे काम शासकीय विमा कंपनीला देण्यात आले आहे. त्याला महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे.

रुग्णालयांची संख्याही वाढवली
महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजना करीता यादीवर 500 रुग्णालय होते. आता त्यामध्ये दुपटीने वाढ करीत ही संख्या एक हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी असलेल्या रुग्णांना त्वरित उपचार मिळतील. त्यांची गैरसोय होणार नाही. आणि या दोन्ही योजनेचा उद्देश सफल होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

“तळागाळातील तसेच शेवटच्या घटकांपर्यंत वैद्यकीय उपचार मिळावेत हा शासनाचा प्रमुख उद्दिष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात सहा लाखांपेक्षा जास्त रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत. यासाठी संबंधित रुग्णालयांना तेराशे कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. आर्थिक विवंचना मुक्त उपचार रुग्णांना मिळत आहेत. ते पूर्णपणे मोफत असल्याने एक रुपया खर्च करायची गरज लागत नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड वर्षांमध्ये अतिशय चांगले काम करता आले आहे. यापुढेही गरीब गरजूंना विनाविलंब, मोफत आणि वेळेत उपचार मिळतील यावर कटाक्ष असेल”

डॉ. सुधाकर शिंदे
मुख्य कार्यकारी अधिकारी
महात्मा फुले जन आरोग्य योजना
महाराष्ट्र राज्य