कामोठेतील लोकसहभाग उद्यान उजेडात येणार

 


सेक्टर 36 येथील मैदान हायमास्ट बसवण्यास सुरुवात
हेमलता गोवारी यांच्या नगरसेविका निधीतून खर्च
पनवेल/ प्रतिनिधी: कामोठे येथे सेक्टर 36 मधील भूखंड क्रमांक -17 येथे रहिवाशांनी जे .एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उद्यान विकसित केले. परंतु सिडकोने त्यामध्ये अनेक अडथळे घातले. आणि कोणतीही सुविधा दिली नाही. दरम्यान या ठिकाणी दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधाराचे जाळे पसरले होते. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना तसेच येथे येणाऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. त्यानुसार रहिवाशांनी मंगेश अढाव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका हेमलता रवी गोवारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या नगरसेवक निधीतून हायमास्ट बसवण्याचे काम हाती केले आहे. यामुळे हे उद्यान आता उजेडात येणार आहे.
सेक्टर 36 परिसरात मोठ्या प्रमाणात सोसायटी आहेत. येथील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परंतु पायाभूत सुविधांचा वाणवा आहे. विशेष करून येथे एकही उद्यान क्रीडांगण सिडकोने विकसित केलेले नाही. त्यामुळे रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी जे .एम. म्हात्रे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेल्या सेक्टर 17 येथील भूखंड साफ करण्यात आला. त्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकून भराव करण्यात आला. त्यानंतर रोलिंग करून सपाटीकरण करण्यात आले. बाजूला जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला. तसेच योगा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली बाजूला झाडे लावून बसण्यासाठी बेंचेस टाकण्यात आले. त्या कालावधीत सिडकोने आडमुठे धोरण घेतले. याबाबत रहिवाशांनी सिडकोला जाब विचारले होते. दरम्यान या सार्वजनिक मोकळ्या जागेवर लोकसहभागातून सेक्टर 36 वेल्फेअर ग्रुपने क्रीडांगण आणि एक प्रकारे उद्यान बनवले. याठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ मोठ्या प्रमाणात रहिवासी येतात. लहान मुलं सुद्धा खेळतात, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनाही विरंगुळ्यासाठी येथे उत्तम सोय झाली आहे. परंतु या भूखंडावर विजेची कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे दिवस मावळल्यानंतर येथे अंधार पसरतो. तसेच रात्रीच्या वेळी या मैदानावर मद्यपी गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. तसेच इतर प्रकारसुद्धा होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दारूच्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकून दिला जात असल्याने सकाळी आणि संध्याकाळी येथे येणाऱ्यांना त्रास होत होता. पायाला आणि हाताला काच लागल्याने एक दोघांना इजा झाल्याच्या ही घटना घडल्या आहेत. दरम्यान येथे दिवाबत्तीची सोय करावी अशी मागणी वेल्फेअर ग्रुपने सिडकोकडे केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मंगेश अढाव व इतर सहकाऱ्यांनी नगरसेविका हेमलता रवी गोवारी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी आपल्या नगरसेवक निधीतून सेक्टर 36 येथील उद्यानात हाय मास्ट बसून देण्याची ग्वाही दिली. आणि त्यानुसार शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. गोवारी यांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी रवी गोवारी, अर्जुन डांगे,
मंगेश अढाव, रत्नकुमार भिडे , मधुसूदन नायर , सुषमा सिंग, रेवंत गुलिया उपस्थित होते.त्रिमूर्ती एन्टरप्राइजेसला हे काम देण्यात आले आहे. येत्या काही दिवसात हायमास्ट उभारून तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.