कळंबोली सर्कल डिझेल ने माखले

 


डिझेल भरलेला कंटेनर झाला आडवा
रविवारी पहाटे पाच वाजता ची घटना
नाना करंजुले
पनवेल/ प्रतिनिधी:- द्रुतगती महामार्गाच्या कळंबोली पुलाखालून एमजेपी चे पाणी सतत वाहत असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या बाजूचा परिसर सतत ओला असतो. परंतु रविवारी सकाळी कळंबोली सर्कल चा काही भाग चक्क डिझेलने माखला. जेएनपीटी बाजूने डिझेल भरून आलेल्या कंटेनरला अपघात होऊन जागेवर आडवा झाला. त्यामुळे आत मधील डिझेल रस्त्यावर वाहिले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली.
टँकरमध्ये डिझेलची वाहतूक केली जाते. हे सर्वांनाच माहीत होते. परंतु कंटेनरमध्ये डिझेल नेले जाते हे रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात दिसून आले. आत मध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये डिझेल भरण्यात आले होते. नायलॉनच्या गोण मध्ये त्या पिशव्या टाकण्यात आल्या होत्या. या माध्यमातून डिझेलची वाहतूक करणारा एक कंटेनर रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जेएनपीटी कडून मुंब्रा बाजूकडे चालला होता. भरधाव वेगाने आलेल्या या ट्रेलरला टन बसला नाही. त्यामुळे कळंबोली सर्कल वर उड्डाणपुलाखाली संपूर्ण कंटेनर व ट्रेलर आडवा झाला. आणि आत मधील डिझेल पावसाच्या पाण्याप्रमाणे बाहेर रस्त्यावर वाहू लागले. ते इतका मोठ्या प्रमाणात होते की त्याचा ओघळ थेट एमजीएम हॉस्पिटल पर्यंत गेला. दरम्यान कळंबोली वाहतूक शाखेचे पी एन गायकवाड, सुधाकर बोंबले, भोरे यांनी तत्परता दाखवा ट्रेलर चालकाला बाहेर काढले. कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांच्या सूचनेनुसार त्वरित कळंबोली अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांना माहिती दिली. ते काही वेळातच घटनास्थळी आले. क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर बाजूला घेण्यात आला.

ओमिनी गाडीने पेट घेतला
रस्त्यावर डिझेल सांडल्याने त्यावरून जात असलेल्या ओमिनी गाडीने अचानक पेट घेतला. परंतु कळंबोली अग्निशमन दलाच्या जवानांनी ऑन दी स्पॉट ही आग विझवली. दरम्यानच्या काळात काही मोटरसायकल घसरल्या परंतु कळंबोली वाहतूक पोलिसांनी बॅरिकेट्स लावून प्रतिबंधात्मक उपाययोजना केली.

डिझेल काळ्या बाजाराचे?
दरम्यान अशाप्रकारे अधिकृतरित्या डिझेलची वाहतूक करता येत नाही. अशाप्रकारे डिझेल नेणे धोकादायक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ते बेकायदेशीर आहे . हे चोरीचे किंवा काळ्याबाजाराचा असण्याची शक्यता आहे. कळंबोली पोलिसांनी त्याचे नमुने घेतले असून तेया प्रकरणाचा तपास करीत आहेत.

डिझेलवर अनेकजण तुटून पडले
कोंबड्या, बिअर च्या बाटल्या तसेच भाजी फळांनी भरलेले वाहनांना अपघात झाल्यानंतर सर्वजण इथे तुटून पडतात. अशा संधीसाधू मंडळी सकाळी कळंबोली सरकल येथेही दिसले. कंटेनर मधून बाहेर पडणारे डिझेल भरण्यासाठी अक्षरचा झुंबड उडाली होती.