सतरा वर्षांपूर्वीच्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा

 

 


शिरूर येथील सिटी बोरा कॉलेजमध्ये गेट-टुगेदर
2003 च्या कला शाखेचे विद्यार्थी जमले
नाना करंजुले
शिरूर- महाविद्यालय शिक्षणाचे दिवस मंथरलेले असतात. अकरावी ते पदवीपर्यंत पाच वर्ष कधी निघून जातात हे समजतच नाही. मग अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या दिशा निवडतात. स्वतःचे करियर घडवतात. आपल्या दैनंदिन कामातून अनेकदा वेळ मिळत नाही. परंतु हे सर्व करीत असताना कॉलेज लाईफ आठवणीच्या कप्प्यांमध्ये कायम टवटवीत असते. त्याला अनेकदा मनोमन उजाळा देण्याचे काम प्रत्येक जण करत असतो. परंतु दुरावलेले आणि संपर्क बाहेर असलेले मित्र- मैत्रिणीची भेट होत नसल्याची खंत असते. यांच्याशी संवाद आणि गप्पा गोष्टींचा योग येईल की नाही याची खात्री देता येत नाही. परंतु सिटी बोरा कॉलेज शिरूर मध्ये कला शाखेत 2003 ला पदवी घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी 9 फेब्रुवारी 2020 म्हणजेच रविवारी एकमेकांना भेटले. गप्पागोष्टी करीत संवाद साधला. आणि सतरा वर्षांपूर्वी च्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.
महाविद्यालय शिक्षण घेत असताना ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात. नेमके जग कसे असते याची माहिती हळूहळू मिळायला सुरुवात होते. लेक्चर, नोट्स, अभ्यासिका, ग्रंथालय आणि परीक्षा याशिवाय अनेक गोष्टी या महाविद्यालयात असतात. खेळ, साहित्य, काव्य, वाद-विवाद, वक्तृत्व, गॅदरिंग, कथाकथन, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकास साधता येतो. सामाजिक बांधिलकी, श्रमसंस्कार, प्रामाणिकपणा, ध्येय, धाडस, चिकाटी जिद्द या सर्व गोष्टी महाविद्यालयीन जीवनातच मैत्री करतात. आणि ती आयुष्यभर निभावतात. कॅन्टीन मध्ये जाऊन वडापाव खाणे. एसटीची तासं तास स्टॅंडवर वाट पाहत बसणे. कधी कधी लेक्चर बुडवणे, मित्र-मैत्रिणींबरोबर भटकत राहणे, बाजारपेठेत फिरणे एकमेकांशी मजाक मस्ती करणे. महाविद्यालय मित्रां- मैत्रिणींसोबत प्रत्येक जण जितका खुलतो. मन मोकळ करतो ते इतरांसमोर कधी जमत नाही. सर्व प्राध्यापक त्याकाळात ज्ञानाचे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये सिंचन करतात. त्यांना सक्षम बनवतात. व्यावहारिक, वैज्ञानिक विचारांची पेरणी ते महाविद्यालय तरुण-तरुणींमध्ये करतात. एकंदरीतच उद्याचे उत्तम नागरिक घडविण्याचे काम हे महाविद्यालयीन शिक्षक करतात. त्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सिटी बोरा कॉलेज सुद्धा ठरू नये. शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा या तीन तालुक्यांचे विद्यार्थी याठिकाणी उच्चशिक्षण घेण्यासाठी येतात. अनेक विद्यार्थी येथून शिकून बाहेर पडलेले आहेत. त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.2003 यावर्षी कला शाखेत पदवी घेतलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. कोणी वकील आहेत, तर काहीजण पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करीत आहेत. काही या खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करीताहेत. कित्येकजण प्रगतिशील शेतकरी आहेत. या बॅच मधील बरेचसे माजी विद्यार्थी त्यांच्या गावाचा गाडा चालवताहेत. काही सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. यावेळी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थिंनी सुद्धा कुठेही मागे राहिलेल्या नाहीत. कित्येक जणी नोकरी करून आपले कुटुंब सांभाळत आहेत. सिटी बोरा कॉलेज मध्ये घेतलेले शिक्षण आणि संस्कार कोणीच वाया जाऊ दिले नाही. काहींनी अनेक वादळ, संकट परतावून लावले. आणि सिटी बोरा कॉलेजमधून मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा पुन्हा उभे राहण्यासाठी वापर केला. सतरा वर्षांपूर्वी बीएची पदवी घेऊन चारही दिशांना या महाविद्यालय तरुण- तरुणांनी आपले क्षेत्र निवडून त्याठिकाणी स्थायिक झाले. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वजण एकत्र आले. आणि रविवारी त्यांनी स्नेह संमेलनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद साधला. परस्परांची विचारपूस केली. त्याचबरोबर कौतुक आणि प्रोत्साहन देण्यासाठी ते सुद्धा ते विसरले नाहीत. कॉलेजच्या सभागृहांमध्ये हे छोटेखानी परंतु तितकेच स्नेहभाव, हृदय स्पर्शी स्नेहसंमेलन पार पडले. सर्वांनी आपली नवीन ओळख करून दिली. आणि आपल्या मनोगतात आनंद व्यक्त केला. या आनंदी, उत्साही कार्यक्रमासाठी इतिहासाचे प्राध्यापक डॉ. पद्माकर प्रभुणे, चंद्रकांत धापटे, प्रा. विरकर, प्रा. ससाणे उपस्थित होते. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारामध्ये फेरफटका मारला. झालेले बदल आपल्या दृष्टीमध्ये टिपले. मैदानावर जाऊन सर्वजण सतरा वर्ष मागे गेले. दुपारी एकत्र जेवण घेऊन रोज संवाद साधण्याच्या अटीवर 2003 च्या या कॉलेज युवक-युवतींनी एकमेकांचा निरोप घेतला.
विठ्ठल चौधरी, योगेश महाजन यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

सोशल माध्यमांनी 2003 ला जवळ केले
समाज माध्यमांचा सकारात्मक वापर केल्यानंतर अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. या माध्यमातून दुरावलेले मित्र आणि मैत्रिणी एकत्र येतात. हे सिटी बोरा कॉलेज मध्ये रविवारी 2003 यावर्षी पदवी पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनातून स्पष्ट झाले. सिटी बोरा कॉलेज ए डिव्हिजन या नावाचा ग्रुप स्कॅलर मिञ पोलीस उपनिरिक्षक शरद नाणेकर,अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माजी विद्यार्थी आणि कायदेतज्ञ ऍड अतुल अडसरे यांनी तयार केला. आणि पाहता पाहता जवळपास सर्वजण त्यामध्ये ॲड झाले. त्यातूनच रविवारी एकत्र जमण्याचा संकल्प करण्यात आला. विशेष म्हणजे तो सिद्धी सुद्धा नेण्यात आला.