उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी सायकलवर

 

 


दीपा मुधोळ मुंडे यांनी ठेवला वस्तुपाठ
उस्मानाबाद /प्रतिनिधी:- व्यायाम याबरोबरच प्रदूषण मुक्तीसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी सोमवारपासून कार्यालयांमध्ये जाण्या-येण्यासाठी सायकलचा वापर सुरू केला आहे. त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे सायकल वापरण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे प्रशासकीय दृष्ट्या प्रमुख असतात. त्यांच्यावर सर्व प्रकारचे जवाबदारी असते. बैठका, जिल्हा नियोजन मंडळातील मंजूर करण्यात आलेला निधी त्याचे वितरण. शासकीय योजनांची अंमलबजावणी. महसूल यासारखे अनेक कामे त्यांना असतात. वाहनांचे ताफे, आजूबाजूला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या राबता हे सर्व जिल्हाधिकारी म्हटल्यावर आलेच. कार्यालयात येण्या-जाण्यासाठी तसेच इतर दौरे बैठका या करिता शासकीय वाहनांचा लवाजमा जिल्हाधिकारी वापरतात. परंतु उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे याला अपवाद ठरत आहे. सोमवारपासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याकरीता आणि तेथून घरी जाण्यासाठी सायकलचा वापर सुरू केला आहे. त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारीसुद्धा सायकलवर ये जा करू लागले आहेत. सायकलिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहेच. त्याचबरोबर इंधन बचत पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. जिल्हाधिकाऱ्यांचा हा इको फ्रेंडली प्रवास जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांसमोर वस्तुपाठ ठेवणारा ठरला आहे.