पनवेल वाहतुक शाखा छत्तीस वर्षांपासून हद्दपार!

 

हद्दीत म्हणजे पनवेल शहरात शाखा हलवावी

नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पनवेल संघर्ष समितीचे साकडे
शहरातील दोन पर्याय निवेदनात सुचवले
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल शहर वाहतूक शाखेचे कार्यालय हे कळंबोली च्या हद्दीत म्हणजेच आसुडगाव येथे आहे. ही जागा गैरसोयीची आहेच. तसेच येथे सुविधांचा अभाव आहे. वाहन चालक, नागरिक तसेच वाहतूक पोलीसांना सोपस्कार व्हावे म्हणून ही वाहतूक शाखा हद्दीत म्हणजेच पनवेल शहरात हलवावी अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी काही सोयीस्कर पर्यायी जागांचा ही प्रस्ताव दिला आहे.
पनवेल वाहतूक शाखा 1983 पासून आसुडगाव येथे आहे. पनवेल आणि नवीन पनवेल शहर, राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा आणि पळस्पे फाटा असा विस्तारित भाग त्यांच्या नियंत्रणाखाली येत आहे. या परिसरात कुठेही वाहनांवर कारवाई केली की, ती वाहने रात्री कार्यालयाच्या अपुऱ्या जागेत दाटीवाटीने ठेवण्यात येतात. त्यामुळे छोट्या वाहनांचे मोठे नुकसान होते. विशेषतः महिला दुचाकीस्वरांना कार्यालय शोधून काढण्यात गैरसोयीचे होते. पनवेलचा झपाट्याने विकास होत असताना वाहतूक पोलिसांसाठी चांगली सुसज्ज अशी वास्तू असावी असा मुद्दा पनवेल संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.
पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या पाठीमागे.पनवेल शहरात मोठा भूखंड आहे. त्यावर ग्रामीण पोलिस ठाणे, परिमंडळ-2 पोलिस उपायुक्तांचे कार्यालय, सहाय्यक पोलिस आयुक्तांचे कार्यालय, पोलिसांसाठीचे मंथन सभागृह, वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्तांचे बंद स्थितीतील कार्यालय आणि राखीव दलाच्या तुकडीसाठी काही खोल्या आहेत. त्याशिवाय भले मोठे मैदान आहे. मैदान आणि कार्यालयांव्यतिरिक्त मोकळी जागा आहे. तिथे पनवेल महापालिकेकडून वाहतूक खात्याच्या प्रशस्त कार्यालयाची इमारत बांधून घेण्यासाठी पत्रव्यवहार करावा, अशी विशेष मागणी पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.
याशिवाय सिडकोच्या भूखंडावर कार्यालयाची इमारत बांधायची झाल्यास सिडकोकडून भूखंड आणि इमारत बांधून घेताना ठाणे नाक्यावरील सिमरन मोटर्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडाचा विचार करावा, असे सूचित केले आहे.

सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाचा तात्पुरता पर्याय

तूर्तास वाहतूक खात्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप आहे. या जागेचा पनवेल शहर वाहतूक शाखेसाठी तात्पुरता वापर करण्याचा प्रस्ताव कडू यांनी दिला आहे. जेणेकरून नागरिकांनी वाहतूक पोलिसांची गैरसोय टळेल.

महापालिका आणि सिडकोचे दुर्लक्ष!
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याचे काम वाहतूक पोलीस करतात. वाहतूक नियमन करण्याची महत्वपूर्ण भूमिका ते निभावतात. त्यामुळे सिडको आणि महानगरपालिकेने त्यांना आवश्यक त्या सुविधा देणे गरजेचे आहे. विशेष करून पनवेल शहर आणि नवीन पनवेल येथील प्रमुख जबाबदारी सांभाळणाऱ्या पनवेल शहर वाहतूक शाखेला सुसज्ज आणि चांगले कार्यालय बांधून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणावर आहे. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे.