सत्कारा ऐवजी दिव्यांगांना कल्याणकारी आधार

 

करंजुले कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला वस्तुपाठ
युवा उदयोजक गणेश करंजुले सुप्रिया सातव यांच्याशी विवाहबध्द
पारनेर  /प्रतिनिधी- तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील युवा उद्योजक गणेश एकनाथ करंजुले हे शुक्रवारी सोमनाथ भाऊसाहेब सातव यांच्या कन्या सुप्रिया हिच्याशी विवाहबद्ध झाले. श्रीगोंदा तालुका हद्दीतील सातववाडी येथील मंगल कार्यालयात
 पार पडलेल्या या विवाह सोहळयात करंजुले कुटुंबीयांनी सत्काराला फाटा दिला. आणि तीच रक्कम त्यांनी आधार दिव्यांग कल्याणकारी ट्रस्टला देणगी स्वरूपात दिली. या माध्यमातून त्यांनी समाजासमोर एक वस्तुपाठ ठेवला आहे.
लग्न समारंभ म्हटले की मानपान, आदरतिथ्य या सर्व गोष्टी आल्याच त्यातली त्यात अहमदनगर जिल्हयात ही गोष्ट फार प्रचलीत आहे. तसे पाहिले गेले तर लग्नाकरीता आलेली प्रत्येक व्यक्ती वधु आणि वर पक्षाकरीता महत्वाची असते. मात्र मोठया लोकांचाच फेटा बांधून सत्कार केला जातो. किंवा काही जण इतर प्रकारे आदरतिथ्य करतात. हा सत्कार समारंभामुळे अनेकदा  लग्न घटिका टळून जाते. प्रत्यक्ष अक्षदा मुर्हतावर पडत नाहीत. त्याचबरोबर आलेल्या वऱ्हाडी मंडळीला एक प्रकारे वेठीस धरले जाते. सत्कार समारंभ होईपर्यंत वधु-वर करवल्या, पुरोहित, वाजंत्री, वाढपे यांच्याखेरीज सर्वजण ताटकळत उभे राहतात किंवा बसतात. या सर्व गोष्टींचा विचार करीत नवरदेवाचे थोरले चुलते भाऊसाहेब किसनराव करंजुले,विठ्ठल करंजुले आणि वडील एकनाथराव करंजुले यांनी आपल्या घरातील मागील दोन मंगल कार्यात ज्या पद्धतीने सत्काराला फाटा दिला होता. त्याचप्रमाणे शुक्रवारी पार पडलेल्या गणेश व सुप्रिया यांच्या शुभविवाहाचा निमित्ताने मोठ्या प्रमाणात पै पाहुण्यांची मांदियाळी जमली होती. पारनेर आणि श्रीगोंद्याचे आमदार तसेच पनवेल येथूनही राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. या सर्वांचे यजमानांकडून आदरातिथ्य करण्यात आले. तसेच त्यांना शब्द सुमनांनी सन्मानित करण्यात आले. परंतु दोनही कुटुंबीयांकडून मात्र शाल श्रीफळ, फेटा या पारंपरिक आणि वेळेचा अपव्यय करणाऱ्या सत्काराला फाटा देण्यात आला. या बदल्यात दोन धनादेश आधार दिव्यांग कल्याणकारी ट्रस्टला राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. संस्थेच्या वतीने भाग्यश्री मोरे आणि राजेंद्र भुजबळ यांनी हे धनादेश स्वीकारले. नवरदेवाचे बंधू सुनील भाऊसाहेब करंजुले हे विकलांगांच्या कल्याणार्थ काम करीत आहेत. एका अपघातामध्ये स्वतःला आलेले अपंगत्व विसरून ते अहोरात्र इतर विकलांगांना आधार देण्याचे काम करतात. त्यांच्या प्रेरणेतूनच 14 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या शुभविवाह मध्ये सत्कार न करता ती रक्कम दिव्यांगांच्या कल्याणार्थ संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमाचे माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत, युवक काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, जिल्हा सरचिटणीस भाऊ पावडे, अजिनाथ सावंत, पारनेरचे सभापती गणेश शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, ह .भ. प .गुलाब महाराज करंजुले,अतुल लोखंडे यांच्यासह उपस्थितांनी कौतुक केले.वर मुलाची भगिनी गायत्री वर्पे, बंन्धु भरत करंजुले, शशिकांत करंजुले यांनी ही संकल्पना शुभविवाह च्या निमित्ताने यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.वधु पक्षाकडूनही कोणाचाच सत्कार करण्यात आला नाही.परंतु उपस्थितांचे सातव परिवाराकडून स्वागत करण्यात आले.