शिवभक्तांच्या श्रद्धेला मिळाली सामाजिक ‘ दिशा’

 


महादेवाला दुग्ध महाप्रसादाचा अभिषेक
शिवलिंगावर दूध न ओतण्याच्या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद
दिशा महिला मंचचा कामोठे येथे अनोखा उपक्रम
पनवेल /प्रतिनिधी: श्रद्धेपोटी अनेक जण महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगावर दुधाचा अभिषेक घालतात. त्यामुळे शेकडो लिटर दूध वाया जाऊन त्याची नासाडी होते. हेच दूध महादेवाच्या पिंडीवर न ओतता ते जमा करून त्याचा प्रसाद म्हणून शिवभक्तांना कामोठे येथे वाटण्यात आला. इतकेच नाही तर काही दूध गरीब गरजूंना देऊन दिशा महिला मंचने अनोखा उपक्रम राबवला. मंचच्या हिरकणींनी एक वेगळा वस्तुपाठ शिवभक्त आणि समाजासमोर ठेवला. याचे सर्व स्तरातून कौतुक झाले.

कामोठे येथे तलावा लगत आणि सेक्टर 8 येथे असे दोन शिव मंदिर आहेत. याठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुक्रवारी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरवर्षाप्रमाणे यंदाही अनेकांनी महादेवाच्या पिंडीवर दूध वाहण्यासाठी आणले होते. परंतु दिशा महिला मंचच्या हिरकणींनी हे दूध शिवलिंगावर न वाहता ते प्रसाद म्हणून सर्वांना वाटू हे काम महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुण्याचे होईल. हे भाविकांना पटवून दिले .पाहता पाहता शेकडो लिटर दूध दिशा महिला मंचने जमा केले. आणि ते गरम करून महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या शिवभक्तांना प्रसाद म्हणून वाटले. तसेच ते आदिवासी पाड्यावर आणि लहान मुलांच्या वस्तीगृहात सुद्धा देण्यात आले. दिशा महिला मंचच्या संस्थापक निलम आंधळे यांच्या नेतृत्वाखाली विद्या मोहिते, रेखा ठाकूर, ख़ुशी सावर्डेकर, दिपाली खरात ,विद्या वायकर , भावना सरदेसाई, रूपा कवीश्वर, अश्विनी नलावडे, उषा डुकरे प्रतिभा पवार,भाग्यलक्ष्मी,अर्चना,शिल्पा चौधरी, प्रमिला झिंजाड यांनी अथक परिश्रम घेतले . मंडळाचे अध्यक्ष सखाराम जाधव आणि बाळाराम चिपळेकर तसेच रमेश म्हात्रे,किशोर गोवारी,संतोष म्हात्रे, जनार्दन गोवारी, विजय गोवारी, विश्वास पावणेकर यांनीही मोलाचे सहकार्य केले.

महाशिवरात्रीचे निर्माल्य ही जमा केले
महाशिवरात्रीनिमित्त कामोठे येथील या दोन्ही मंदिरात मोठ्या प्रमाणात पान फुल हार, त्याचबरोबर कौठ आणि धोत्र्याचे फळ महादेवाच्या पिंडीवर वाहण्यात आले. हे सर्व निर्माल्य दिशा महिला मंचने एकत्रित जमा केले. आणि त्याचे कंपोस्ट खत निर्माण करण्यासाठी केंद्रावर पाठवले. या माध्यमातून मंचने भाविकांची श्रद्धा जपत स्वच्छ भारत अभियानाला ही सहकार्य केले. तसेच सामाजिक बांधिलकीही जपली.

“शिवलिंगावर दूध टाकल्याने बऱ्याच प्रमाणात ते वाया जाते . त्यानंतर अनेक दिवस त्या उग्र वासाचा त्रास जवळपास राहणाऱ्या रहिवाशांना होतो. हे टाळण्यासाठी जमा दूध गरम करून प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात आले . दूध पिशव्या आदिवासी पाड्यावर आणि लहान मुलांच्या वसतिगृहात देण्यात आले. शेकडो लिटर दूध वाया न जाता ते शिवभक्त आणि गरजूंना महाप्रसाद म्हणून देत आले याचे मनोमन समाधान आहे. दिशा ग्रुप मधील हिरकणींनाही वेगळाच आनंद हा उपक्रम देऊन गेला.”
नीलम आंधळे
संस्थापिका दिशा महीला मंच